(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला'; राहुल गांधींच्या विधानावरुन एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या या विधानावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
Eknath Shinde On Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला, अशी टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू- एकनाथ शिंदे
आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही- एकनाथ शिंदे
आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असं एकनाश शिंदेंनी सांगितले.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. तसेच यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
'भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न'; सुप्रिया सुळे कडाडल्या, केंद्र सरकारवरही साधला निशाणा