Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती दिली.
Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनेच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर शिंदे गटाच्या काही आमदारांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. यावर महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती दिली.
आम्ही पक्षात ठरवले आहे की अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल. त्यामुळे अनेक लोकांना संधी देऊ शकतो. जो काम करेल त्याला संधी मिळेल. जो विभाग ज्याला मिळेल तिथे त्याने पूर्ण काम करून दाखवले पाहिजे. जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी भाजपचा देखील अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल, असा फॉर्म्युला ठरला आहे का?, असा सवाल केला. यावर आम्ही प्रत्येक मंत्र्यांच्या परफॉर्मन्स ऑडिट करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिंदेंसारखं भाजपनेही आपल्या मंत्र्यांसंदर्भात अडीच वर्षाचा फॉर्मुला ठरवला आहे का?, फडणवीस म्हणाले...
शिंदेंसारखं भाजपनेही आपल्या मंत्र्यांसंदर्भात अडीच वर्षाचा फॉर्मुला ठरवला आहे का?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर आम्ही मंत्र्यांच्या परफॉर्मन्स ऑडिट करू, आणि त्या ऑडिटमध्ये लक्षात आले की मंत्री योग्य काम करत नाही आहे, तेव्हा त्या मंत्र्यांचा पुनर्विचार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. आज कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तिघांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे की परफॉर्मन्स ऑडिट केला जाईल. ज्यांना मंत्री म्हणून घेतले नाही, त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल... भाजपमध्ये ज्यांना मंत्री केलं जात नाही, तेव्हा त्यांना पक्षाकडून काही वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात.. मात्र जे मंत्री आज ड्रॉप झाले आहे त्याच्यामध्ये काही लोक परफॉर्मन्स न केल्यामुळे ड्रॉप झाले असतील असेही होऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.