Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराआधी घडामोडींना वेग! मंत्र्यांच्या नावांची यादी दिल्लीत पाठवली; सागर बंगल्यावर वर्दळ वाढली
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे.
मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी दिल्लीत पोहोचली असून औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता काही मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
आमदार प्रकाश सोलंकी सागर बंगल्यावर दाखल आहेत. आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. मंत्रीपदासाठी काही नेते वारंवार पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेत होते, त्यामुळे आता कोणत्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू
शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू असल्याची चर्चा आहे, काही नेत्यांच्या मंत्रीपदाला शिवसेना पक्षातून तसेच भाजपमधून देखील विरोध होत असल्याची माहिती आहे. काल (शुक्रवारी) रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहर्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत.
राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सागर निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या नेत्यांची नाव
प्रकाश सोळंके - राष्ट्रवादी काॅग्रेस
राहुल आवाडे - भाजप
राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
संजय राठोड - शिवसेना
कुमार उत्तमचंद आईलानी - भाजप
नमिता मुंदडा - भाजप
रावसाहेब दानवे - भाजप
संजय शिरसाट - शिवसेना
राजू पाटील - मनसे
जयदत्त क्षरसागर - भाजप
बंटी बांगडिया - भाजप