Nagpur : काँग्रेसकडून बौद्ध समाजाच्या महिलेला उमेदवारी दिलीच पाहिजे; नागपुरातील महिला नेत्यांची आग्रही मागणी
नागपूर ही आंबेडकराईट मुव्हमेंटचे देशातील प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसने बौद्ध समाजाच्या महिलेला उमेदवारी दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर(Nagpur) ही आंबेडकराईट मुव्हमेंटचे देशातील प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसने (Congress) बौद्ध समाजाच्या (बौद्ध दलित) महिलेला उमेदवारी दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी पक्षाच्या नेत्या तक्षशिला वाघधरे यांनी केली आहे. तक्षशिला वाघधरे नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आम्ही काँग्रेसचे पेड वर्कर नाही, तर आम्ही संघटनेत काम करणारे लोक आहोत. एकतर पक्षाने ठरवून घ्यावं की संघटनेतील पदाधिकार्यांना उमेदवारी देणारच नाही, किंवा पक्षाने संघटनेतील कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्यावं, असं वाघधरे म्हणाल्या.
काँग्रेसमधील इच्छुक महिला उमेदवारांची चढाओढ
नागपूर जिल्ह्यात काँग्रेस काही महिला उमेदवारांना संधी देऊ शकतात, ही माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसचे अनेक महिला नेत्या आपली दावेदारी समोर करू लागल्या आहेत. त्याच मालिकेत तक्षशिला वाघधरे यांनी उमरेड मतदारसंघातून बौद्ध समाजाच्या महिलेला उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आग्रह केला आहे. काँग्रेस नेते सुनील केदार नागपुरात काही महिला नेत्यांना संधी देऊ इच्छितात, ही माहिती येताच काँग्रेस मधील महिला नेत्यांमध्ये दावेदारी पेश करण्याची चढाओढ लागली असल्याचेही बघायला मिळाले आहे.
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण
विधानसभा निवडणुकींचे (Vidhansabha election 2024) बिगुल वाजल्यापासून काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वाटपाचा संघर्ष समोर येण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते आता दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दोघेही अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत असून यांच्यातला वाद आता हायकमांडच्या दरबारात मांडला जाणार आहे. ठाकरे गटाने दावा केलेल्या 12 जागांपैकी एकही जागा काँग्रेस सोडायलाच तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील जागा सोडू नये यासाठी काँग्रेसचे नेते हाय कमांड कडे मागणी करणार असल्याचं सांगितलं जातंय. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी दक्षिण नागपूर ही आमची पारंपरिक जागा राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा गड आमच्याकडेच राहावा अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
दरम्यान विदर्भातल्या ज्या जागेवर काँग्रेसचे संख्याबळ, नगरसेवक होते या सर्व ठिकाणी आम्ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. यासाठी ते दिल्लीतही जाणार असून काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा