Madha Vidhansabha Election : माढ्यात मोठा ट्वीस्ट, बबनदादा शिंदेंचा युटर्न; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित
Madha Vidhansabha Election : माढा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. बबनदादा शिंदे हेच पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील, असे बोलले जात आहे.
Madha Vidhansabha Election : गेल्या काही दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Vidhansabha Election) चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै 2023 मध्ये महायुतीत (Mahayuti) जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडली होती. ते सातत्याने अजित पवारांसोबतही (Ajit Pawar) दिसले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलले. माढ्यातील लोकांनी लोकसभेला शरद पवारांचे (Sharad Pawar) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा लीड दिला. त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही माढ्यात तापला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मी निवडणूक लढणार नाही. मला 6 वेळेस निवडून दिलं, आता मुलाला साथ द्या, असं आवाहन बबन शिंदे (baban shinde) यांनी केलं होतं. शिवाय, महायुतीचा प्रश्नच राहिला नाही. मी मुलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यांनी उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढू असंही बबन शिंदे म्हणाले होते.
शरद पवारांच्या आग्रहानंतर बबनदादा शिंदे मैदानात उतरणार?
दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात आता मोठा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. माढ्यात सहा वेळा विजयी झालेले आणि नुकतेच अजित पवारांची साथ सोडलेले आमदार बबनदादा शिंदे हेच यंदा तुतारी या चिन्हावर माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. बबनदादा शिंदे यांनी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, शरद पवारांच्या आग्रहानंतर बबनदादा शिंदे हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे मानले जात आहे.
बबनदादा शिंदेंना मुलाला उभं करायचं होतं
यंदा माढ्यातून बबनदादा शिंदे यांना आपला मुलगा रणजीत शिंदे याला उभे करायचे होते. त्याच्याच तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असताना आता शरद पवारांच्या आग्रहानंतर आमदार शिंदे हे स्वतःच निवडणूक लढविण्यास तयार झाल्याची माहिती आहे. जर आमदार शिंदे यांनी शरद पवार गटातून उमेदवारी घेण्याचे निश्चित केल्यास माढ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आता या जागेसाठी पवार गटाकडून इच्छुक असणारे रणजीत सिंह मोहिते-पाटील , अभिजीत पाटील , संजय बाबा कोकाटे हे कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार?
बबनदादा शिंदे आणि मोहिते पाटील घराण्याचे संबंध तितके चांगले नसल्याचे बोलले जाते. मोहिते पाटील यांना आव्हान देण्यासाठी सोलापुरात अजित पवारांनी शिंदे बंधूंना बळ दिल्याचे बोलले जाते. दरम्यान, अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबिय पुन्हा एकदा शरद पवारांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिले आहे. मात्र, शरद पवारांनी माढ्यात बबनदादांना उमेदवारी दिल्यास मोहिते पाटलांची भूमिका काय असेल? हे पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी माढा विधानसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढतील, अशीही चर्चा सुरु होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला