Madha : यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी भाजपचा कार्यकर्ता काम करणार नाही, माढ्यात बंडाचं निशाण फडकलं
Madha: राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नसल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर : महायुतीच्या पराभवानंतर (Mahayuti Lok Sabha Election) आता त्याची कारणे शोधण्याचे काम भाजपकडून (BJP) सुरु करण्यात आले असून पराभूत खासदार रणजीत निंबाळकर (Ranjeet Nimbalkar) यांच्या सहकाऱ्यांनी माढा लोकसभेतील (Madha Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) पराभवाचे खापर फोडले आहे . यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुती मधील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रश्न उभे राहणार आहे. यापूर्वी संघाने थेट अजित पवार यांच्या पक्षावर महाराष्ट्रातील पराभवाचे खापर फोडले असताना आता विविध मतदारसंघातून राष्ट्रवादी विरोधी सूर भाजपकडून बाहेर येऊ लागला आहे.
भाजपचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्याकडे तक्रार करताना फलटण येथील राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण, रामराजे निंबाळकर तसेच माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे यांनी भाजपला कोणतीही मदत न केल्याचे निंबाळकर समर्थक जयकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. माढा आणि करमाळा या दोन मतदारसंघात मोहिते पाटील यांना निर्णायक आघाडी मिळाल्याचा शिंदे यांचा दावा आहे. त्याच पद्धतीने फलटण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाने पूर्णपणे विरोधी काम केल्याने फलटणमध्ये हवे तेवढे लीड मिळू शकले नसल्याचा त्यांचा दावा आहे .
राष्ट्रवादीसोबत माढ्यात भाजपचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नाही : जयकुमार शिंदे
सांगोला विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही भाजपसाठी काम केले नसल्याचा आरोप जयकुमार शिंदे आणि शिष्टमंडळाने केला आहे. यामुळे यापुढे या राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नसल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत फटाके फुटण्यास सुरुवात
राष्ट्रवादी सोबत भाजपचे विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही पक्षविरोधी काम करीत धैर्यशील मोहिते पाटील याना मदत केल्याने त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्याची मागणी या शिष्टमंडळाने भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत फटाके फुटण्यास सुरुवात झाल्याने लोकसभा पराभवाने अडचणीत आलेल्या महायुतीच्या अडचणीत अजून वाढ होणार आहे .
हे ही वाचा :
माढ्यात शिंदे विरुद्ध साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण