ABP Majha Opinion Poll: मविआसाठी शुभसंकेत, ठाकरे-पवारांची जादू चालणार, व्होट ट्रान्स्फरिंगचा मोठा फायदा
Loksabha Election 2024: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. महाविकास आघाडीला मोठे यश.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलचे निष्कर्ष पाहता तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या ओपिनियन पोलच्या (Loksabha Opinion Poll) आकडेवारीवर नजर टाकल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांना एकमेकांच्या व्होटबँकेचा फायदा होताना दिसत आहे. या तीन पक्षांची व्होटबँक एकमेकांना योग्यप्रकारे ट्रान्सफर झाल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) मविआला 20 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. याउलट महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटांमध्ये ग्राऊंड लेव्हलला अपेक्षित मनोमिलन न झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे 45 पेक्षा अधिक जागांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून चालणाऱ्या महायुतीला अवघ्या 28 जागांवर समाधान मानावे लागू शकते.
ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार, महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला 22 जागांवर विजय मिळेल. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त 6 जागा जिंकता येतील. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला 4 आणि शरद पवार गट आणि ठाकरे गटाला एकत्रितपणे तब्बल 16 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. ही परिस्थिती पाहता दोन बडे पक्ष फोडून आणि विरोधी पक्षातील मातब्बर नेते गळाला लावल्यानंतरही भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. ही बाब भाजपसाठी निश्चितच चिंताजनक आहे.
उद्धव ठाकरेंची मशाल धगधगणार, शिंदे आणि अजितदादांना दोघांना मिळून केवळ 6 जागाच मिळणार
शिंदे गट-अजितदादांना साथ मिळूनही एनडीए आघाडीला फटका
2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनला 35 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 38 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळी युपीए आणि एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत 3 टक्क्यांचा आणि 18 जागांचा फरक होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी 35 टक्क्यापर्यंत खाली घसरली. तर त्यावेळी एनडीएच्या मतांची टक्केवारी 51 टक्के इतकी होती. तर 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 33.7 टक्के आणि एनडीए आघाडीला 51.3 टक्के मतं मिळाली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा गट बाहेर पडल्यामुळे 2024 च्या निवडणुकीत एनडीएला मोठा फटका बसताना दिसत आहे. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलच्या अंदाजानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्या मविआ आघाडीला 42.1 टक्के मतं मिळतील. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला 42.7 टक्के मिळतील. याचा अर्थ मविआ आणि महायुतीच्या मतांच्या टक्केवारीत अवघ्या 0.6 टक्क्यांचा फरक आहे. याचा अर्थ अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आमदारांचा मोठा गट घेऊन एनडीएमध्ये येऊनसुद्धा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या असल्यास मतांची ही टक्केवारी आणखी सात ते आठ टक्क्यांनी वाढवावी लागेल, असे दिसत आहे.
आणखी वाचा
लोकसभेला महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल