Lok Sabha Election: कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान, बारामतीने गॅप भरुन काढला, तिन्ही मतदारसंघाची अंतिम आकडेवारी हाती!
Maharashtra Politics: महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यापैकी तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे रोजी पार पडले. या टप्प्यात साखर पट्ट्यातील लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता.
मुंबई: राज्यातील साखर पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी मतदान पार पडले होते. या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. बारामती (Baramati), कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 59.37 टक्के इतकी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये 61.82 टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे आता बारामतीमध्ये हा दोन टक्क्यांचा फरक निर्णायक ठरणार का, हे पाहावे लागेल. (Maharashtra Lok Sabha Election Third Phase Voting)
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.50 टक्के आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात 71 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल ऐडगे यांनी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये 70.86 टक्के आणि हातकणंगले मतदारसंघात 70.60 टक्के इतके मतदान झाले होते.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये मतदान करताना ईव्हीएम मशीनचे व्हीडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
तिसऱ्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघांमध्ये मतदान झाले?
लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील साखर पट्टा म्हणून ओळखले जाणाऱ्या मतदारसंघांसह अन्य चार ठिकाणी मतदान झाले होते. बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशिव आणि लातूर या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. या सर्व जागांचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
आणखी वाचा