'मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या', भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Karnataka: बंगळुरूमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वारंवार होणाऱ्या संघर्षाच्या घटनांबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Karnataka: बंगळुरूमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वारंवार होणाऱ्या संघर्षाच्या घटनांबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांना लक्ष्य करण्याच्या हिंदू संघटनांवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या.'' कर्नाटकातील धारवाडमध्ये श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना अशा कारवाया थांबवण्याचे आवाहन केले आहे.
हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रित राहायचे आवाहन
येडियुरप्पा म्हणाले आहेत की, “हिंदू आणि मुस्लिमांनी एकाच आईच्या मुलांसारखं एकत्रित राहावं, अशी माझी इच्छा आहे. काही समाजकंटक यात अडथळा आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही आश्वासन दिले आहे.'' ते म्हणाले, "किमान यापुढे तरी अशा अनुचित घटना घडू नयेत आणि आपण एकत्रित राहायला हवं. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांनाही मी शांततेचं आवाहन करतो."
अनेक संघटनांनी केली बहिष्कार टाकण्याची मागणी
कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील मंदिरांजवळ असलेल्या मुस्लिम समुदायाच्या लोकांच्या दुकानांवर बंदी घालण्याची, हलाल मांसावर बहिष्कार घालण्याची आणि फळांच्या व्यापारातील मुस्लिमांची मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर मशिदींमधील लाऊडस्पीकरवरही कारवाईची मागणी होत आहे. याशिवाय अनेक संघटनांनी मुस्लीम कारागिरांनी बनवलेल्या मूर्ती आणि या समाजाच्या सदस्यांनी चालवल्या जाणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 2023 च्या सुरुवातीलाच निवडणूक होऊ शकते. यासाठीच धार्मिक वातावरण पेटवले जात असल्याचे बोलण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha