Opposition Meeting : विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Opposition Meeting In Patna : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज पाटण्यात दाखल होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेही पाटण्यातल्या बैठकीत असणार आहेत.

Opposition Meeting In Patna : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची (Maharashtra Leaders) फौज पाटण्यात दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेही पाटण्यातल्या (Patna) बैठकीत असणार आहेत. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे हे तीन प्रमुख नेते बैठकीला असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती असेल. 23 जून रोजी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात बिहारमधल्या पाटण्यात विरोधकांची एकत्रित बैठक होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची महत्त्वाची बैठक
2024 मधील लोकसभा निवडणुकीच्याआधी विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. याआधी वेगवेगळ्या कारणांमुळे या बैठकीची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 23 जून रोजी म्हणजे परवा ही बैठक पाटण्यात होत आहे. विशेष म्हणजे मोदी विरोधकांच्या राष्ट्रीय पातळीवरील एकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा होताना दिसत आहे. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकप्रकारे महाराष्ट्रातील नेत्यांची फौजच विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यामध्ये काम करताना दिसेल. या बैठकीला राष्ट्रीय पातळीवरील 15 ते 16 पक्षांची उपस्थिती या बैठकीला असेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारी ही पहिली बैठक आहे. या पक्षांचा विरोध कसा आकार घेईल हे पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखणार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी भाजप आणि मोदी विरोधकांची बैठक बोलावली आहे. राजधानी पाटणामध्ये होणाऱ्या या बैठकीत 15 हून अधिक विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुढील रणनीती या बैठकीत आखली जाईल. मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही. बैठकीत राज्य पातळीवरील राजकारणातील समन्वय आणि विरोध यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नही विरोधक करणार आहेत. सर्व विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. "सरकारकडून देशातील सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. लोकशाही कमकुवात करण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच देशात द्वेषाचे वातावरण वाढत आहे," असे आरोप सातत्याने विरोधकांकडून केले जात आहेत. सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. अशा स्थितीत हे सर्व मुद्दे अधिक तीव्रतेने मांडणे यावर देखील चर्चा होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
