'शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले, पण...'; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका
Laxman Hake On Sharad Pawar: कुणालाही आमच्या हक्कावर गदा आणू दिली जाणार नाही, महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
Laxman Hake On Sharad Pawar: राज्यात ओबीसी समाज (OBC Reservation) 60 टक्के असून, या समाजाला वेठीस न धरण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या माध्यमातून होत आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असं विधान ओबीसी आरक्षण बचाव नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) मराठा- ओबीसी वाद लावण्याचे काम करत असल्याची टीका ओबीसी आरक्षण बचाव नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. लोहा येथे काल लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आली. त्या सभेत बोलत असताना हाके यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच कुणालाही आमच्या हक्कावर गदा आणू दिली जाणार नाही, महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
शरद पवार 4-5 वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते- लक्ष्मण हाकेंचा निशाणा
राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले. पण ओबीसीतील अठरापगड जातीचे अंतःकरण कळले नाही. ते कळाले असते तर शरद पवार 4-5 वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. तसेच लोह्याबरोबरच नांदेड जिल्ह्यातून पाच ओबीसी आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं.
मनोज जरांगे संपूर्ण राज्याला वेठीला धरत आहे- लक्ष्मण हाके
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे जरांगेच्या भेटीला चार ते पाचवेळा गेले. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही. मग अशा माणसाला तुम्ही कधी धडा शिकवणार काय? मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे संपूर्ण राज्याला वेठीला धरत असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी लोहा येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात केला.
ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का?
ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का? 288 आमदारांनी एक कार्ड तयार करून ओबीसी समाज बांधवांच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. तर तुम्ही कोणाचे 288 आमदार पाडणार आहात? अशी विचारणाही लक्ष्मण हाके यांनी केली.
आणखी वाचा