![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jitendra Awhad: महाडच्या मनुस्मृती आंदोलनामुळे आव्हाड अडचणीत; शिवसेनेकडून अटकेची मागणी,भाजपनंतर वंचितही संतप्त
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
![Jitendra Awhad: महाडच्या मनुस्मृती आंदोलनामुळे आव्हाड अडचणीत; शिवसेनेकडून अटकेची मागणी,भाजपनंतर वंचितही संतप्त Jitendra Awhad: Mahad manusmriti 's movement in the arms of Awhad; Demand for arrest from Shiv Sena, Vanchit also angry after BJP Jitendra Awhad: महाडच्या मनुस्मृती आंदोलनामुळे आव्हाड अडचणीत; शिवसेनेकडून अटकेची मागणी,भाजपनंतर वंचितही संतप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/29/7e0ed2dd2b13a9c6e96034ce8bf7287917169806714911002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले. त्यानंतर, मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती (Manusmriti) पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) त्यांच्या या घटनेवर भाष्य करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यमामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपानेही आव्हाड यांच्या या कृतीची निषेध व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांचे छायाचित्र फाडून महाड आंदोलनात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. आता, वंचित बहुजन आघाडीनेही आव्हाड यांच्याकडून झालेल्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा संताप
आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने आव्हाड यांच्याकडून झालेल्या कृतीवर भाष्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन निषेध करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून आव्हाडांच्या अटकेची मागणी
राष्ट्रवादीचे उत्साही नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा अवमान आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे. एकीकडे जय भीम म्हणायचे आणि दुसरीकडे असे कृत्य करायचे. या कृत्यानंतरची माफी म्हणजे हे सगळं नाटक आहे. आव्हाड यांची माफी म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. राज्य सरकार त्या गोष्टी अभ्यासक्रमात घेणार नाही, तरीही त्यांनी हा स्टंट कशासाठी केला, असे म्हणत राजू वाघमारे यांनी आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
आव्हाडांवर गुन्हा दाखल होऊ शकतो
जितेंद्र आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची नेहमी सवय आहे, आज त्यांनी जे पोस्टर फाडले त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बाजूला करणे अपेक्षित होते, त्यांचा मान राखणे गरजेचे होते. मात्र, आव्हाड यांना त्याचे भान राहिले नाही. आव्हाड यांचा स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या या चुकीवर अनेक बहुजन समाजाचे कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
आव्हाडांनी मागितली माफी
मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले, यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामुन केलं नाही. आमच्या विरोधकांना काय राजकारण करायचं आहे, ते करतील ते खूप काही मागणी करतील. पण, त्यावर मी अधिक काही बोलणार नाही, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपावरही आव्हाड यांनी प्रत्त्युत्तर दिलं. माझा स्टंट आहे की नाही ते जाऊ द्या. पण, मनुच्या पुस्तकावर मिटकरी यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी सांगावं, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केल.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)