Nitesh Rane: तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एक असेल! काँग्रेस नेत्याच्या ट्विटवर नितेश राणेंची सूचक प्रतिक्रिया
Maharashtra Politics: काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपवासी होणार? नितेश राणेंच्या सूचक ट्विटनंतर चर्चांना उधाण. गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठावान मानले जाणारे राज्यातील तीन प्रमुख नेते सत्ताधारी पक्षांच्या गळाला लागले आहेत. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी मिलिंद देवरा हे शिंदे गटात, बाबा सिद्दीकी अजित पवार गटात तर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळात काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपमध्ये (BJP) जाणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नितेश राणे यांनी अलीकडेच एका भाषणात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी भाषा वापरली. एका नेत्याचा उल्लेख करताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर नितेश राणे समोर उभ्या असलेल्या पोलिसांना पाहून म्हणाले की, पोलिसांनी माझं भाषण रेकॉर्ड करु दे. पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. आमच्या राज्यात आम्हाला काय करु शकणार? जागेवर राहायचंय ना?, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. त्यांच्या या भाषणावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवत टीका केली होती.
महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?, असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवारांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यांबद्दल भाजपला जाब विचारला होता. वडेट्टीवारांच्या या ट्विटला रिप्लाय देताना नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी एक सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, 'कोणी केला महिलांचा अपमान ? हिंदू भगिनींना 'लव्ह जिहाद'च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्मा च्या बाजुने बोलणारा नसतो, हे लक्षात असून दे. महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलीसांची काळजी वाटली नाही का ? असो.. आपण original हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण. काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल. म्हणुन.. इथेच थांबतो ! जय श्री राम', असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर आता वडेट्टीवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा