Nitin Gadkari PM Post Offer: मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण... नितीन गडकरींचा गौप्यस्फोट
Nitin Gadkari PM post offer: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल, याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव कायम आघाडीवर असते. अशातच नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि लोकप्रिय चेहरा असणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे. नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा आणि क्लीन इमेज यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात अधुनमधून चर्चा सुरु असते. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षातील बड्या नेत्याकडून पंतप्रधानपदाची (Prime Minister) ऑफर देण्यात आल्याचे सांगितले. गडकरी यांच्या या स्पष्टोक्तीमुळे राजकारणात नवी रंगत येण्याची शक्यता आहे.
नितीन गडकरी यांनी नागपूरमधील या कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले असले तरी यामुळे राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते. 2014 पासून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा कोणताही दावेदार उभा राहिला नव्हता. भाजपमध्ये सबकुछ मोदी अशी एकंदर परिस्थिती आहे. मात्र, गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांच्या नावांची पंतप्रधानपदासाठी चर्चा होत असते. यामध्ये आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर नितीन गडकरी यांचे नाव उघडपणे पंतप्रधानपदाच्यादृष्टीने पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते.
आणखी वाचा
स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता: नितीन गडकरी