Manikrao Kokate: I AM VERY HAPPY...रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी मदत...
Manikrao Kokate: कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदावरुन हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंनी दिली. तसेच नवीन खातं आवडलं का?, असं विचारताच I AM VERY HAPPY, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
अजितदादांनी एका दगडात मारले दोन पक्षी-
खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय. कृषिखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरील वर्णी ही भरणेंसाठी लॉटरीच मानली जातेय. एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय. तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषिखातं देत अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षा मारल्याची चर्चा रंगली आहे.
कोकाटेंचं खाते बदलताच सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल-
माणिकराव कोकाटे यांचं खाते बदलताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून कोकाटेंना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण-
महाराष्ट्र शासनाला 'भिकारी' म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.























