काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा केजरीवालांवर पहिला हल्ला; म्हणाले, कधी त्यांना पंतप्रधान व्हावं वाटतं, तर कधी...
Harshvardhan Sapkal on Arvind Kejriwal : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Harshvardhan Sapkal on Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Vidhan Sabha Election) आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. भाजपने दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना देखील पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आपल्या खासदारांसह दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना भेटले. या भेटीत केजरीवालांसह झालेल्या चर्चेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. काँग्रेसचे टार्गेट भाजप नाही तर अरविंद केजरीवाल होते. काँग्रेसला (Congress) भाजपाला (BJP) नाही तर अरविंद केजरीवालांना हरवायचे होते, असा दावा सामनाच्या रोखठोकमध्ये करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (harshvardhan sapkal) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
केजरीवालजी यांनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहावं. सोयीनुसार विधान करणे, निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो, अशा वल्गना त्यांनी केल्या असत्या. कधी स्वतः त्यांना पंतप्रधान व्हावं वाटते, तर कधी काँग्रेस संपवावी, असे वाटते. त्यांची पंजाबमध्ये काँग्रेसच्या अनुषंगाने एक भूमिका असते. गुजरातमध्ये एक असते, गोव्यामध्ये तिसरी असते. अशा परिस्थितीमध्ये केजरीवालजींनी ठरवून घ्यावं की काय करावं? असे म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.
काँग्रेसमुळे ‘आप’ उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या विशेष सदर रोखठोकमधून दिल्लीतील निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिल्लीचा पराभव हा काँग्रेससह आपमुळेही झाला, असा अप्रत्यक्षरित्या दावा करण्यात आला. दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव म्हणजे एका स्वप्नाचे मरण आहे. आदर्शवाद, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त शासन हे स्वप्न घेऊन केजरीवाल व त्यांचे लोक आधी रस्त्यावर आणि मग राजकारणात उतरले. त्यांचे स्वप्नही शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपात गढूळ झाले व आता भाजपने त्या स्वप्नाचा पराभव केला. यास जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल उपस्थित करण्यात आला आहे. काँग्रेसमुळे ‘आप’ उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव झाला. त्यात अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांचा समावेश आहे. काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही, पण केजरीवाल यांची सत्ता घालविण्यात काँग्रेसने भूमिका बजावली. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्लीच्या विजयाने मोदी व त्यांच्या लोकांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढला. मोदी 240 जागांवर लोकसभेत थांबले. त्यानंतर ‘इंडिया’ आघाडीही थांबली. त्यामुळे मोदी ‘340’च्या आवेशात वावरत आहेत, असे सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
Jayant Patil : जयंत पाटील कुठेही जावोत, आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू; कार्यकर्त्यांची भूमिका























