शरद पवार लोकशाही मानत नाहीत, निवडून आलेले त्यांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळं निवडून आलेत का? पडळकरांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांनी आज मारकडवाडी गावाला भेट दिली. याच मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी त्यांच्यावर टीका केली.
Gopichand Padalkar on Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांनी आज मारकडवाडी गावाला भेट दिली. याच मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी त्यांच्यावर टीका केली. हम करे सो कायदा यासारखं शरद पवार वागत आहेत. शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का? हे आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत, असे म्हणत पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली.
मारकडवाडी गावाला शरद पवारांनी दिली भेट
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) या गावाचे नाव देशभर गाजत आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज याच मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात सभेत बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशाचे अनेक खासदार मला भेटतात, ते एकच चर्चा करतात ती फक्त तुमच्या गावाची. मला विचारतात की हे गाव कुठे आहे? संपूर्ण देशाच्या जे लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या कसे लक्षात आले? तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन संपूर्ण देश करत आहे, याचाच आम्हा सर्वांना आनंद होत असल्याचे शरद पवार म्हणाले.
गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर मतदानाची प्रक्रिया बंद
मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते असल्याचे समोर आल्याने अंतर त्यांच्या गटाने यावर आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडलेले आहेत . हे आंदोलन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी सुरू केले आहे. या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. या गावाचा आवाज एबीपी माझाने समोर आणला आणि तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने 2 डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदानास विरोध केल्याने अखेर 3 डिसेंबर रोजी होणारे मतदान ऐनवेळी रद्द करावे लागले होते