मोठी बातमी : राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं, अखंड शिवसेनेसाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक मैदानात
दोघे एकत्र येतील की नाही हे माहिती नाही, त्यांनी अटी टाकल्यात असं ऐकलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी महायुतीची सोबत सोडावी, तर हे म्हणाले काँग्रेसची सोबत सोडा, ते अगदी बरोबर आहे.

मुंबई : राज आणि उद्धव यांनी एकत्र आले पाहिजे ही इच्छा महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेचं (Shivsena) विभाजन झालं, सेना आणि मनसेमुळे शिवसेनेचं नुकसान झालं. मुलं एकत्र आली पाहिजेत, त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ठाकरे ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड राहिला पाहिजे अशी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांची इच्छा असल्याचं बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिंदे गटातील शिवसेना नेते गजानन कीर्तीकर (gajanan kirtikar) यांनी म्हटलं. तसेच, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे या तिघांनीही एकत्र आलं पाहिजे, अखंड शिवसेना एक झाली पाहिजे, असेही कीर्तीकर यांनी म्हटलं. विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकांवेळी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेसाठी प्रचार केला होता, तत्पूर्वी त्यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता.
दोघे एकत्र येतील की नाही हे माहिती नाही, त्यांनी अटी टाकल्यात असं ऐकलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी महायुतीची सोबत सोडावी, तर हे म्हणाले काँग्रेसची सोबत सोडा, ते अगदी बरोबर आहे. आजच्या दोन शिवसेना आहेत. एक उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि दुसरं एकनाथ शिंदेंचं. पण, एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आज माहिती नाही पण काल परवापर्यंत काँग्रेसप्रणित आहे. त्यामुळे, मूळ जो शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेचा प्रश्न आहे, हा विचार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. बाळासाहेबांचं हिंदुत्व, आक्रमक शैली, राष्ट्रीयत्व, मराठी माणसांचा सर्वांगिण विकास हे मुद्दे घेऊन एकनाथ शिंदे पावलं टाकीत होते. पण, भाजपप्रणित असल्यामुळे पुढे सरकायला त्यांना अडचणी येतात, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.
दोघांनी ज्या अटी टाकल्यात त्या योग्य आहेत. कारण एकसंघ भक्कम शिवसेना होण्यासाठी हे अडथळे आहेत. हे पार केल्याशिवाय भक्कम शिवसेना होणार नाही. एनडीएमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, पण त्यांनी एनडीए सोडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंना एनडीएमध्ये प्रवेश घ्यावा लागला. शिंदे आणि ठाकरे दोघांनाही बाळासाहेबांच्या विचारधारेला पुढे न्यायचं ठरवलं. बाळासाहेबांनी खूप मोठी ताकद उभी केली आहे, जो मतदार आहे, कार्यकर्ता आहे, तो बाळासाहेबांच्या विचारधारेने प्रेणित आहे. तो बाळासाहेबांची शिवसेना जाणतो, तो काँग्रेसप्रणित किंवा भाजपप्रणित शिवसेना जाणत नाही. शिवसेनेचे ते खरं स्वरुप बाळासाहेबांचं पुन्हा प्राप्त करायचं असेल तर या दोघांनी त्यांची साथ सोडायला हवी.
अखंड शिवसेना व्हावी, तिघांनीही एकत्र यावे
बाळासाहेबांना स्वत:ला वाटत होतं राज आणि उद्धव एकत्र यावे. या विभाजनाचा धोका आपल्याला आहे, हे ते जाणत होते, त्यांना आम्ही सल्ला देण्याची गरज नव्हती. आता राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचा स्टँड घेतला आहे, तो चांगला आहे. पण बाळासाहेबांची कडवट आणि भव्य दिव्य शिवसेना महाराष्ट्रात अवतरायची करायची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा यांच्यासोबत यायला हवेत असं माझं मत आहे, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र आले तरच भक्कम शिवसेना दिसेल, अशा शब्दात कीर्तीकर यांनी काळाजी गरज ही अखंड शिवसेनेची असल्याचे म्हटले. बाळासाहेबांच्या विचारांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी असेल आणि त्यांनी निश्चय केला तर होऊ शकेल. शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे, असेही कीर्तीकर म्हणाले.
भाजपचा शिवसेना विभाजितच हवी आहे
भाजपला हे विभाजितच हवं आहेत, एकत्र नको आहेत. भाजपला शत प्रतिशत महाराष्ट्रात पुढे जायचं असेल तर शिवसेनेची साथ लागेल जी साथ एकेकाळी उद्धव ठाकरेंनी दिली होती, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली. त्यामुळे अखंड शिवसेना आपल्यासोबत नाही, एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत आहे, तेच त्यांना पाहिजे, असे म्हणत गजानन कीर्तीकर यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला.
अखंड शिवसेनेसाठी पुढाकार घेणार का?
अखंड शिवसेनेच्या पुढाकारासाठी मी पुढाकार घेईन, नक्की मला तसा अधिकारही आहे, कारण मी बाळासाहेबांपासून काम करतोय. शिवसेनेच्या जडणघडणीपासून काम करतोय, मराठी माणसांसाठी काम केलंय, लोकाधिकार चळवळीत काम केलंय. राज, उद्धव आणि एकनाथ शिंदेंना त्याची कल्पना आहे. त्यामुळे मी माझी इच्छा प्रकट करेन, आग्रह धरेन, पुन्हा आमचे जुने दिवस जे आहेत ते येतील, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं. तर, भाजप हा वेगळा विषय आहे, त्यांच्यासोबत युती हा वेगळा विषय आहे. पहिल्यांदा शिवसेना म्हणून तिघांनी राज-उद्धव-एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं, असेही कीर्तीकर यांनी म्हटलं.
हेही वाचा
मोठी बातमी : राज-उद्धव एकत्र या, शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित, गजानन किर्तीकरांची 5 मोठी वक्तव्य!

























