(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटाला यांना 4 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 50 लाखांचा दंड ही भरावा लागेल
Disproportionate Assets Case: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Disproportionate Assets Case: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष सीबीआय न्यायाधीश विकास धुल यांनी त्यांना 50 लाखांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच चौटाला यांच्या 4 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या मालमत्ता दिल्लीतील हेली रोड, गुरुग्राम, असोला आणि पंचकुला येथे आहेत. या सर्व संपत्ती सरकारी मालमत्ता खात्यात जमा केल्या जातील. याशिवाय चौटाला यांच्यावर लावण्यात आलेला दंडही महसूलात जमा केला जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
2006 मध्ये सीबीआयने ओमप्रकाश चौटाला यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख चौटाला यांच्यावर 1993 ते 2006 दरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. 16 वर्षांच्या खटल्यानंतर, 21 मे रोजी त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत 2.81 कोटी रुपयांची मालमत्ता मिळवल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13(1)(ई) आणि 13(2) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या कलमांमध्ये 1 ते 7 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे.
87 वर्षीय ओमप्रकाश चौटाला यांच्या वकिलाने त्यांचे वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली होती. जेबीटी शिक्षक भरती घोटाळ्यात 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या चौटाला यांच्या वकिलाने बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात शिक्षेसह त्याची गणना करण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ते मान्य केले नाही आणि चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली. 50 लाखांचा दंड ठोठावताना न्यायालयाने सांगितले की, ही रक्कम जमा न केल्यास चौटाला यांना 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Monsoon News : पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
Uttarakhand Accident : उत्तरकाशीमधील अपघातात विदर्भातील दोन भाविकांचा मृत्यू