Uddhav Thackeray: पहलगामच्या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेक्यांचा थांगपत्ताही नाही; प्रकाशित केलेले फोटोही चुकीचे; ते गेले तरी कुठे? पहलगामच्या घटनेवर उध्दव ठाकरेंचा संताप
Uddhav Thackeray on Pahalgam Attack: हल्ल्याआधी गलथानपणा, गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं त्याची जबाबदारी कोणी घेतली? कुणीच घेतली नाही, असंही उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यावरती शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेक्यांचा थांगपत्ताही नाही, या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेकी सापडणे सोडाच, त्यांचा साधा थांगपत्ताही लागलेला नाही. या अतिरेक्यांची पहिली चित्रे प्रकाशित केली गेली, नंतर म्हणे ती चित्रे बरोबर नाहीत. अतिरेकी आले, आपल्या लोकांना डोळ्यादेखत गोळ्या घालून गेले… अरे, ते मग गेले तरी कुठे? असा सवाल देखील उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मुळात हा हल्ला होऊच कसा शकला?
खासदार संजय राऊतांच्या खास करून पहलगामची घटना... तिथे भयंकर अतिरेकी हल्ला झाला... देशात हाहाकार उडाला.... आमच्या महाराष्ट्रातल्या माताभगिनींसह 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं... या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, होय, तुम्ही सांगताय ती घटना धक्कादायक आणि संतापजनक आहे, पण माझा प्रश्न असा आहे की, मुळात हा हल्ला होऊच कसा शकला? कश्मीरमध्ये परिस्थिती पूर्ववत झाली आहे असं आम्हाला सातत्याने सांगण्यात येत होतं. खरं तर ती व्हायलाच हवी. कारण कश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. अलीकडे तिथे पुन्हा पर्यटन सुरू झालं होतं. त्यामुळे पुरेसा बंदोबस्त तिथे ठेवण्याची गरज होतीच. कारण कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या या भागाकडे तिथे सारे काही आलबेल आहे असे समजून आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
साऱ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं
मग काय व्हायला हवे होते? यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, काय म्हणजे? हल्ल्याआधी गलथानपणा, गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं त्याची जबाबदारी कोणी घेतली? कुणीच घेतली नाही. सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्यासाठी सैन्याच्या शौर्याला सलाम! त्याबद्दल वाद असूच शकत नाही. परंतु आपल्या कश्मीरात आपण जाऊ शकतो. आनंदाचे, सुखाचे क्षण आपल्या कुटुंबीयांसह तिकडे घालवू शकतो या विश्वासाने जे पर्यटक तिथे अगदी बिनधास्तपणे गेले होते त्यांच्यावर अचानक गोळीबार झाला. साऱ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले याला जबाबदार कोण? जिथे ही घटना घडली तो परिसर भौगोलिकरीत्या सीमेपासून किती आतमध्ये आहे. इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे, हा खरा प्रश्न आहे. धारावीसाठी जसे मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घातलेत तसे तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही दिलेत? एखादा भूखंड तुम्ही त्यांना फुकट द्या ना... त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरून रक्त सांडून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्यांना मुंबईत स्थान नाही. हे मधेच कुठून आले? पूर्वी मुंबई पोर्तुगीजांना आंदण दिली होती. तसं तुम्ही मुंबई अदानींना आंदण देताय? काय संबंध आहे?
त्यांचा साधा थांगपत्ताही लागलेला नाही
या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेकी सापडणे सोडाच, त्यांचा साधा थांगपत्ताही लागलेला नाही. या अतिरेक्यांची पहिली चित्रे प्रकाशित केली गेली, नंतर म्हणे ती चित्रे बरोबर नाहीत. अतिरेकी आले, आपल्या लोकांना डोळ्यादेखत गोळ्या घालून गेले... अरे, ते मग गेले तरी कुठे?
हे सरकारचं अपयश आहे असं मानता का तुम्ही? या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मोठं अपयश आहे. कारण तुमच्याच भरवशावर आपले नागरिक तिथे गेले होते ना? कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे आजपर्यंत लोकं कश्मीरमध्ये जायला घाबरतच होते. पण सरकारने सांगितले, आता कश्मीरमध्ये बदल झाला आहे. आताचं कश्मीर वेगळं आहे. आताचा हिंदुस्थान वेगळा आहे. आताचं सरकार वेगळं आहे. आता जर का कुणी काही केलं तर आम्ही घुसून मारू. पण हे काम आपलं सैन्य करतं. त्याच्या शौर्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ.
मोदींनंतर कोण? याचं उत्तर त्यांनी काढलं असेल!
मोदींच्या काळात 'पठाणकोट' झालं. मोदींच्या काळात 'पुलवामा' झालं. 40 जवान त्यावेळी शहीद झाले होते...
हो. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी तिथले राज्यपाल सत्यपाल मलिक काय बोलले होते. पण मलिक जे बोलले त्यावर नंतर कोणी काही बोलायला तयार नाही. उलट त्यांनाच गुन्हेगार ठरवलं. पुलवामात 40 जवान मारले गेले कसे? कोण जबाबदार? ते राज्यपाल मलिक यांनी सांगितले.मोदींच्या काळात आता 'पहलगाम'ही झालं. सातत्याने कश्मीरमध्ये अशा प्रकारे रक्त सांडलं जातंय आणि आपल्याकडून निवडणुकीसाठी म्हणून फक्त राजकीय कारवाया होतात. तसंच एक 'ऑपरेशन सिंदूर' झालं. आणि या 'ऑपरेशन सिंदूर'चा आजही राजकीय प्रचार सुरू आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ला तुम्ही पाठिंबा दिलाय. असं वाटलं होतं की, 'ऑपरेशन सिंदूर' हे पाकिस्तानला जमीनदोस्त करेल आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारतीय सैन्य माघारी येईल...खरं आहे, कारण अशी परिस्थिती तिकडे होती. तशा बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या. आपल्या सैन्याने शौर्य गाजवलं होतं.
मग आता काय?
- एकतर असा क्षण आला होता की, बस, आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय... पाकिस्तानला आपण पूर्ण मोडून टाकतोय, जसा त्यावेळी इंदिराजींनी बांगलादेश पाकिस्तानपासून तोडला तसे पाकिस्तानचे आपण तुकडे करणार आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली. कराचीवर हल्ला झाला, रावळपिंडी, लाहोरवर हल्ला झाला या सगळ्या बातम्या गोदी मीडियावर ऐकून आणि बघून सहाजिकच आपण सगळे आनंदात होतो की, अरे या पाकिस्तानला आपण धडा शिकवतोय. मग असं नेमकं काय घडलं, जे अजूनही गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत? सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं. आपलं सैन्य हे भीमपराक्रमी आहे. त्यांच्या क्षमतेबद्दल कुणाच्या स्वप्नातसुद्धा शंका येणार नाही, पण मग त्यांना थांबवलं का गेलं?
आपले प्रधानमंत्रीसुद्धा शूर आहेत. ते आणि त्यांचे भक्त नेहमी म्हणतात की, त्यांची छाती 56 इंची आहे...
- पण ते अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगताहेत, हिंदुस्थान आणि पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं.. मी युद्ध थांबवलं असं ते सतत बोलताहेत आणि शूर पंतप्रधान गप्प आहेत.
आतापर्यंत ट्रम्प यांनी 27 वेळा सांगितलं...
- होय. मग नेमकं काय? युद्ध का थांबलं? गेल्या अनेक वर्षांपासून कश्मीरचा प्रश्न धुमसतोय, आता पाकिस्तानने पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला घडवला. इकडे लोकांच्या जिवाशी खेळ होतोय. सैनिकांच्या जिवाशी खेळ होतोय आणि तुम्ही मात्र अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत 'डिप्लोमसी'चे खेळ करताय? इकडे जवान मरताहेत... तिकडे शेतकऱ्यांची, आपल्या देशवासीयांची मुलं जवान बनून सैन्यात जाताहेत... ही सगळी आपल्याच समाजाची मुले आहेत. त्यांच्या जिवाशी खेळ होतोय आणि यांची मुले तिकडे दुबईत जाऊन पाकिस्तानसोबतची क्रिकेट मॅच मस्त एन्जॉय करताहेत. पाकड्यांबरोबर मेजवान्या झोडताहेत.
आपण एक पाहिलं असेल की, 'ऑपरेशन सिंदूर' हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे मागे घेण्यात आलं. याचा अर्थ, भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय?
- त्याचा दुसरा अर्थ काय होतो तुम्हीच सांगा.
ज्याची लोकसंख्या 140 कोटी आहे इतका महान देश, मोठा देश. तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरोधाची लढाई थांबवायला सांगतो...
























