(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat Election : कामठी, सावनेरमध्ये सावरकर, केदार यांची प्रतिष्ठा पणाला; 237 ग्रामपंचायतींमध्ये रंगणार रणधुमाळी
जिल्ह्यात सर्वाधिक 59 ग्रामपंचायतच्या निवडणुका सावनेर मतदारसंघात होत असून भाजपचे डॉ. पोतदार यांनी 4 महिन्यांपासून कंबर कसली आहे. तर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री केदार यांची परीक्षा होणार आहे.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील 237 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने आपल्याच पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या वतीने उमदेवारांच्या चाचपणीला आता वेग येणार आहे. सावेनर मतदारसंघात 59 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहे. यानिमित्त माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कामठी-मौदा मतदारसंघातील 52 ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) यांना मतदारांच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. काटोल नरखेड तालुक्यात 49 ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. येथे राष्ट्रवादीला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपाशी सामना करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व आहे. 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेस, 3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक पंचायत समिती शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा निश्चितच कस लागणार आहे. शिंदे गटातील रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघातील रामटेक तालुक्यातील 8 आणि पारशिवनी तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार किती ग्रामपंचायतवर बाळासाहेबांच्या शिवसेनेला विजय मिळवून देतात हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. इटकेलवार यांचे पानिपत करण्यासाठी कट्टर शिवसैनिकांनी (उद्धव ठाकरे गट) कंबर कसली आहे.
'या' तालुक्यात सर्वांधिक 59 ग्रामपंचायत
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 59 ग्रामपंचायतच्या निवडणुका सावनेर मतदारसंघात होत आहेत. सावनेरचा गड जिंकण्यासाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी चार महिन्यांपासून कंबर कसली आहे. इकडे मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री आमदार सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
कामठी-मौद्यात संघर्ष
कामठी-मौदा मतदारसंघातील कामठी तालुक्यातील 27 आणि मौदा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर आणि कॉंग्रेसचे सुरेश भोयर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने-सामने येणार आहेत.
शिंदे गट टिकणार?
रामटेक पंचायत समितीवर झेंडा फडकवल्यानंतर शिंदे गटाचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांचा मतदारसंघ असलेल्या रामटेक तालुक्यातील 8 आणि पारशिवनी तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. येथे प्रचारादरम्यान त्यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या शांता कुमरे यांना संधी मिळाली नसल्याने रामटेक तालुक्यात कॉंग्रेसच्या नेत्याविषयी नाराजी आहे.
'या' तालुक्यात पारवे विरुद्ध पारवे
उमरेड तालुक्यातील 7, भिवापूर तालुक्यातील 10 आणि कुही तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे सुधीर पारवे अधिक सक्रिय झाले. इकडे कुही नगरपंचायत, उमरेड पंचायत समितीवर वर्चस्व मिळाल्यानंतर आमदार राजू पारवे यांना कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.
हेही वाचा