Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाहांचे चरण धुवून आशिर्वाद घेतले, संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरती बोचरी टीका केली आहे.

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा मोठा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदेंनी मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुपचूप दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असल्याची माहिती आणि फोटो समोर आले आहेत. शिंदेंच्या दौऱ्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरती बोचरी टीका केली आहे. राऊत यांनी आपल्या सोशल मिडीयावरती शिंदेंच्या दौऱ्याबाबत टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांचे गुरु अमित शाहांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले, अशी टीका राऊतांनी केली आहे. मराठी एकजूट कशी फोडता येईल, अशी चर्चा शिंदे-शाह यांच्यात झाली असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे, तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा बाकी तपशील लवकरच देईल असा गर्भीत इशारा देखील संजय राऊतांनी यावेळी पोस्टमधून दिला आहे.
संजय राऊत यांची सोशल मिडीया पोस्ट
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली!
तूर्त इतकेच!
बाकीचा तपशील लवकरच!
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागचे अनेक तर्क वितर्क
सोमवारी सुप्रिम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संबधित असलेल्या सुनावनीच्या निमित्ताने वकिलांची गाठभेटीसाठी शिंदे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.
त्याच बरोबर काही दिवसांपूर्वी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकरणची बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाची राष्ट्रीय पातळीवर बांधणी करण्याबाबत हालचाली सुरू असून दिल्लीत इतर राज्यातील प्रमुखांशी बैठक झाल्याचे कळते.
याच दरम्यान शिंदेनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्याचे कळते. यातील राजनाथ सिंग यांच्या भेटीचा फोटो समोर आला असून राज्यातील राजकीय घडामोडीत पुढील निवडणुका लक्षात घेता राजकिय समीकरणांवर चर्चा झाल्याचे कळते.
राज ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात जरी थेट युतीची घोषणा केली नसली तरी उद्धव ठाकरेंबरोबर सहकार्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका नसून, तिच्याकडे हजारो कोटींचे बजेट असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.























