(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ताफा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याकडे...; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात खलबतं
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास एक तास बैठक झाली.
Maharashtra Politics मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सोमवारी (22 जुलै) सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चांनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याकडे आपला ताफा वळवला आणि तब्बल एक तास दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी निमित्त होते फडणवीस यांच्या वाढदिवसाचे.
मुंबईत काल मोठी राजकीय घडामोड झाली. मनोज जारांगे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. मराठा आणि ओबीसी संघर्ष मिटवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षाने येण्यास नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडलं. राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण व्हावा, तो प्रश्न असाच महाराष्ट्रात राहावा आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजली जावी, यासाठी विरोधी पक्षांनी बैठकीला दांडी मारली अशा पद्धतीचा गंभीर आरोप करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारच या सगळ्याच्या मागे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न झाला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक तास बैठक-
दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी पक्षाने मनोज जरांगे यांच्यासोबतच ओबीसी आरक्षण प्रश्नासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन दिलं आहे, याची आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला कसं येणार असा सवाल शरद पवारांनी छगन भुजबळांसमोर उपस्थित केला. त्यानंतर लवकरच मी या सगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन आणि मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी काय तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न करेन, अशी भूमिकाही शरद पवारांनी मांडली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे वळला निमित्त होतं फडणवीस यांच्या वाढदिवसाचे... यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास एक तास बैठक झाली.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक-
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक तासाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री सागर निवासस्थानाच्या बाहेर पडले. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली. या बैठकीसाठी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित झाले. बैठकीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सगळ्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बैठक सुरू झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरुवात झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ,सुधीर मुनगंटीवार ,गिरीश महाजन ,रावसाहेब दानवे ,पंकजा मुंडे हे सगळे महत्वाचे नेते सागर निवासस्थानी उपस्थित झाले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेण्यात आल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी भाजप पक्षाची प्रदेश कार्यकारणी झाली. त्यानंतर पक्षात खलबत सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सागर निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पडली पार तब्बल दोन ते अडीच तास बैठक सुरु होती. बैठकीला आलेल्या नेत्यांशी बोलण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला असता नेत्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.