Eknath Shinde And Amit Shah Meet: रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला?; एकनाथ शिंदेंनी दिल्लीत मुद्दा मांडताच अमित शाहांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले...
Eknath Shinde Sunil Tatkare On Raigad Guardian Ministers: रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde Sunil Tatkare On Raigad Guardian Ministers: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच काल रात्री दिल्लीत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन चर्चा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या. अमित शाह यांच्या या सूचनेनंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. 15 ऑगस्टआधी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 15 ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाकडे की राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडे जातं?, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
पालकमंत्रिपदावरून संघर्ष, तटकरे-गोगावले वादात भाजपने तोडगा सुचवला-
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. या वादाला आता वेगळं वळण मिळालंय.भाजप नेते पंडित पाटील यांनी या वादावर तोडगा देताना पालकमंत्री पद भाजपकडे सोपवावं, अशी थेट मागणी केली आहे. दोघांचाही वाद विकोपाला जात असेल, तर तिसऱ्या पक्षाकडे जबाबदारी द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता अधिकच तापण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्ट ला पालकमंत्री यांच्या हस्तेच झेंडावंदन होणे अपेक्षित आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.
रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रिपद रखडलं-
राज्य सरकारकडून 18 जानेवारी 2025 रोजी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यानंतर आजपर्यंत रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपद रखडलं आहे.
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा चर्चेत आहे. महायुतीतल्या अडचणींच्या मुद्द्यावर यावेळी एकनाथ शिंदेंनी अमित शाहांशी चर्चा केल्याचं समजतंय. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शाहांनी यावेळी दिलं. अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.























