(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : एकनाथ खडसे अमित शाहांच्या भेटीला, रक्षा खडसेंसोबत गृहमंत्र्यांची भेट, भाजप प्रवेशाचं काय ठरणार?
Eknath Khadse Meet Amit Shah: एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
Eknath Khadse, Raksha Khadse Meet Amit Shah: नवी मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि एकनाथ खडसेंनी गुरुवारी अमित शहांची भेट घेतली. दरम्यान, एकनाथ खडसे अजूनही भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. असं असतानाच अमित शहांसोबतची त्यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत असताना नवनियुक्त केंद्रीय मंत्री सीआर पाटील, मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय, बिप्लव देव यांची भेट घेतली. त्यासोबतच नवनियुक्त केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे यांची अमित शाह यांनी भेट घेतली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अडलेला असताना, दुसरीकडे अमित शहांसोबतच्या भेटीला राजकीय वर्तुळात मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश कधी?
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला तरीदेखील एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही ठरताना दिसत नाही. तसेच लोकसभेच्या रणधुमाळीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही भेटीसाठी वेळ दिला नसल्याचं बोललं जात होतं.
अशातच काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये अमित शहा आणि खडसे कुटुंबियांची भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असली तरी एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, भाजपवर नाराज झालेल्या खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पण आता एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी स्वतः कबुली दिली होती. पण अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. अशातच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी दिल्लीत अमित शहांच्या घेतलेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.