Dhananjay Munde Vs Pankaja Munde: धनंजय मुंडे की, पंकजा मुंडे; 2024 मध्ये कोणाला मिळणार उमेदवारी? परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट
Dhananjay Munde vs Pankaja Munde: परळी विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आणि परळीत सुरु झाली आहे.
Dhananjay Munde Vs Pankaja Munde: अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी रविवारी भाजपसोबत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, याचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, आता बीड आणि परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे भाजपसोबत आल्याने आता परळी विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आणि परळीत सुरु झाली आहे.
आतापर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांत दोघांमध्ये हा वाद कमी झाला असून, वेगवेगळ्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभं न राहण्याची त्यांची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, अशातच आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असून, त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आगमी सर्व निवडणुका राष्ट्रवादी म्हणून आणि घड्याळ चिन्हावरच लढवणार असल्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापैकी कुणाला परळीतून उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पंकजा मुंडे यांची भूमिका काय असणार?
पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये सतत डावलण्यात येत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. तर अनेकदा पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या देखील चर्चा झाल्या. त्यातच आता पंकजा मुंडे यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले धनंजय मुंडे भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे याचे परिणाम स्थानिक पातळीवर नक्कीच होणार आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली, आता त्यांच्यासोबतच काम करावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींवर पंकजा मुंडे यांची भूमिका काय असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण आतापर्यंत पंकजा मुंडे यांची कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.
परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट
परळीच्या राजकरणात गेल्या काही वर्षात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असे चित्र पाहायला मिळाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडे बहीण-भावाने एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरत निवडणूक लढवली. ज्यात धनंजय मुंडे यांनी विजयाचा झेंडा फडकवत पंकजा मुंडेंचा पराभव केला. मात्र या निवडणुकीनंतर देखील मुंडे बहीण-भावात असलेला विरोध काही कमी झाला नाही. मात्र आता अजित पवारांच्या भूमिकेनंतर परळीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. कारण धनंजय मुंडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना असलेला राजकीय विरोध जगजाहीर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maharashtra Political Crisis : राज्यात आणखी छोटे-मोठे राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा मोठा दावा