माझं मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण; मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण
मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घडामोडीनंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशानाच्या दुसऱ्याचदिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, राजीनाम्याला 6 महिने उलटूनही त्यांनी अद्याप सातपुडा हे मंत्र्यांसाठीचे निवासस्थान सोडले नाही. त्यामुळे, धनंजय मुंडेंवर सरकार मेहरबान का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत (Mumbai) आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण मुंडेंनी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. त्यासंदर्भात, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सरकारला कायदेशीर इशारा दिला. त्यानंतर, आता धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडली असून सातपुडा बंगला न सोडण्याचे कारणही दिलं आहे.
मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र, या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोधही सुरु आहे, असे स्पष्टीकरण आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे. तसेच, माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती देखील केली आहे, अशी माहितीही धनंजय मुंडेंनी दिली.
दरम्यान, गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडेंनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे. मात्र, सातपुडा बंगला न सोडल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या असून विरोधकांकडूनही टीका होत आहे.
अंजली दमानियांचा संताप, इशारा
धनंजय मुंडे जेव्हा सरकारी बंगला वापरत होते तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले होते की, माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचे आहे. तेव्हा देखील आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहावं. पण आता कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला खाली करणे भाग आहे, क्रमप्राप्त आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं. तसेच, आत्ताच्या घटकाला आपल्याला दिसतंय की त्यांच्या 2024 च्या एफिडेबिटवर वीरभवन नावाची एक बिल्डिंग आहे. जिथे 902 नंबरचा फ्लॅट म्हणजे 2151 स्क्वेअर फूटच्या बहुतेक तो चार बेडरूमचं घर असावं, तोच फ्लॅट मंत्री असताना देखील होता, अशी माहितीही दमानिया यांनी दिली. जर 48 तासात ते बंगला खाली करत नसतील आणि 46 लाखाचा आत्तापर्यंत थकबाकी असलेले दंड आहे तो देखील देत नसतील तर आम्ही सरकारला प्रश्न करू. हा दंड देखील वसूल करण्यात यावा आणि तातडीने मुंडे यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी. 48 तासात त्यांनी ते घर खाली करावं, असा इशाराहि अंजली दमानिया यांनी दिला आहे.
हेही वाचा
लागबागचा राजा परिसरातील अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे; मुख्यमंत्र्यांचं मंडळास आश्वासन
























