Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांकडून लेखानेच प्रत्युत्तर; म्हणाले, तिकडे तर पवार-ठाकरे गट विजयी!
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे.
2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते; पण त्यानंतरही हे आकडे वाढत गेले. मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले. म्हणजे या मतांमध्ये 7.83 टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ 12000 बूथमध्ये नव्या मतदारांची भर पडली. त्यातील 85 मतदारसंत भाजपला विजय मिळाला होता, असा दावा राहुल गांधींनी केला. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात शेवटच्या तासात 18 टक्के मतदान झाले,तिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीत शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, तिथं काँग्रेस विजयी झाली, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणारा अपमान...जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले- देवेंद्र फडणवीस
काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला. 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले. तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर 1 कोटी मतदार वाढल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 2024 मध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन- देवेंद्र फडणवीस
मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात. महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

























