Devendra Fadnavis: भाजपकडून शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
Loksabha Election Seat Sharing: जागावाटपाच्या चर्चेत शेवटच्या क्षणी भाजपचा आक्रमक पवित्रा. भाजप महाराष्ट्रातील 48 पैकी 32 जागा एकट्यानेच लढवणार. शिंदे गट, अजितदादा गटाला प्रत्येक 10 पेक्षा कमी जागांवर लढण्याची नामुष्की?
मुंबई: महायुतीच्या लोकसभा जागावाटपात भाजप स्वत:च्या वाट्याला 32 जागा ठेवून उर्वरित 16 जागांमध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाची बोळवण करेल, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांनी जिंकून येणे हा एकमेव निकष ग्राह्य धरत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 32 जागा भाजप लढवेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अमित शाह यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित 16 जागांचे समसमान वाटप करायचे झाल्यास शिंदे गट (Shivsena Shinde Camp) आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 8 म्हणजे सिंगल डिजिट जागा येतील. तसे प्रत्यक्षात घडल्यास ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी राजकीय नामुष्की ठरेल. त्यामुळे या गोष्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) राज्यातील एक नंबरचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य सध्या दिल्लीत गेले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभेला भाजप 10 पेक्षाही कमी जागा देणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा मिळणार, ही केवळ पतंगबाजी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला इतक्याच जागा मिळणार, अशी चर्चा होणे अयोग्य आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही आमचे साथीदार आहेत. त्यांना आम्ही जागावाटपात योग्य सन्मान देऊ. शिवसेना, राष्ट्रवादीला सिंगल डिजिट जागा मिळणार, हे मीडियाने स्वत:च ठरवले आहे. ही बातमी धादांत चुकीची आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश का नव्हता?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी दिल्लीत आल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने रणनीती काय, वेळापत्रक काय, कोणी काय करायचं? यासंदर्भात भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व प्रत्येक राज्याच्या कोअर कमिटीशी चर्चा करत असते. त्यासाठी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीला बोलवण्यात आले असून आता केंद्रीय नेतृत्त्व आमच्याशी चर्चा करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत ज्या राज्यांमध्ये आमची अन्य पक्षांशी युती आहे, तिकडूनची नावे आलेली नाहीत. कारण युतीमधील पक्षाशी जागावाटपाची चर्चा करायची असते. त्यामुळे पहिल्या यादीत ज्या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर लढतो, तेथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. आता युती असलेल्या राज्यांमधील भाजप उमेदवारांची यादीही जाहीर होईल. यासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी योग्य माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा