Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे 'सामना'च्या अग्रलेखातून कौतूक करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे 'सामना'च्या अग्रलेखातून कौतूक करण्यात आले आहे. 'नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे सामनाच्या (Saamana) अग्रलेखात म्हटले आहे. तसेच तसेच 'देवाभाऊ, अभिनंदन!' असा मथळा अग्रलेखाला देण्यात आला आहे. या अग्रलेखाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील नायगावात हजेरी लावली. नायगावात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साकारले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, जयकुमार गोरे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीतील आमदार उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामनातील अग्रलेखाबाबत विचारण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी चांगलंय, धन्यवाद, असे म्हणत सामनाचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याशी नक्कीच राजकीय मतभेद आहेत. मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते. महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सरासरी टीका व्हायला लागली आहे तरीही आपण काही देणं लागतो. त्यांनी एखाद्या चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था, सामाजिक समीकरणे यांना दिशा देणारं ते पाऊल असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा कौतुक का करू नये? गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथे हत्याकांड झाले, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले, नक्षलवादात हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला. फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांनी संविधान हाती घेतलं, याचे प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक असले पाहिजे. मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा त्यांचेही आम्ही कौतुक केले. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल आणि त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा