Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Pankaja Munde on Baramati : बारामतीसारखाच विकास स्वतःच्या मतदारसंघात करण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिस्तीसह वक्तशीरपणाचेही मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून तोंडभरून कौतुक केलं आहे.
बारामती: बारामतीत (Baramati) विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती (Baramati) शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली. बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, "एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे.
माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन
बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन," असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले आहे.
आज पवार पॅक नाही पॉवर पँक कार्यक्रम
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला वाटलं नाही मी बारामतीत येणार आहे. आज पवार पॅक नाही पॉवर पँक कार्यक्रम आहे. आजची सकाळ वेगळी होती, रोज माझी सकाळ चार-पाच कप चहा आणि डोक्याला ताण देणाऱ्या बातम्या यांनी होते. मात्र, आजची सकाळ वेगळी होती. दर महिन्याला मला बारामतीत बोलवत जा. आधी अजितदादांनी त्यांनी मला सकाळी 7.45 ला भेटण्यास सांगितले. मला यायला 7.31 झाले. पण दादा आधीच गाडीत बसले होते. मी धावत जाऊन गाडीत बसले. बारामतीत मला जरा दर महिन्याला बोलवत जा. इथला प्रोफेशनलिझम मला शिकता येईल, असे मुंडे म्हणाल्या.
बारामतीत मोठा पशु वैद्यकीय दवाखाना व्हावा अशी अजितदादांनी इच्छा व्यक्त केली, नक्कीच प्रयत्न केला जाईल, त्यावेळी देखील मला यावं लागणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना खूप चांगलं पीक कसं घेता येईल हे मला शिकता आलं, आज संपूर्ण पवार फॅमिली एकत्र आली, बारामती सारखी अशी प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रगती व्हावी अशा शुभेच्छा असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.