Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. दोघांनी तब्बल 50 मिनिटे एकाच गाडीतून प्रवास केलाय.
Devendra Fadnavis & Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे आठ ते दहा दिवसांचा वेळ मागितला होता. फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते. परदेशातून परतल्यानंतर आज पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दोघांनी एकाच गाडीतून तब्बल 50 मिनिटे प्रवास केला आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नायगावात सुरू झाला. छगन भुजबळ हे दरवर्षी नायगावात येतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला. निमित्त जरी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे असले तरी चर्चा मात्र छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचीच रंगली आहे. देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने नायगावात दाखल झाले तर दुसरीकडे छगन भुजबळ हे वाहनाने नाशिकहून नायगावात दाखल झाले. नायगाव येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर दोघांची भेट झाली. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यानंतर दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, जयकुमार गोरे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीतील आमदार उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले स्मारक लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांना जगण्याचा अधिकार दिला. समाजातल्या कुप्रथा संपवल्या खूप प्रथा संपवल्या. मी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरता त्यांच्या मूळ गावी आलेलो आहे. महाराष्ट्र शासनाने स्मारकाचा एक चांगला प्रकल्प या ठिकाणी तयार करण्याचे ठरवले आहे. त्याचे प्रेझेंटेशन मी घेतलेले आहे. आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक तयार व्हावे, असे त्यांनी म्हटले.
भुजबळांसोबत काय चर्चा झाली? फडणवीस म्हणाले...
छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासोबत अशी चर्चा झाली की, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला पुढे कसे नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचे काम केले ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येईल, समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल? हीच आमची चर्चा झाली. याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा आमची झालेली नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा