सचिन वाझेंचे पत्र आणि अनिल देशमुखांवरील आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, कारवाईवर बोलताना म्हणाले...
तुरुंगात असलेला अधिकारी सचिन वाझे याने राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
![सचिन वाझेंचे पत्र आणि अनिल देशमुखांवरील आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, कारवाईवर बोलताना म्हणाले... devendra fadnavis comment on sachin vaze letter and allegations on anil deshmukh सचिन वाझेंचे पत्र आणि अनिल देशमुखांवरील आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, कारवाईवर बोलताना म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/03/5a88ddc609593aaea7d43011d0881bca1722678711541988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी आज (3 ऑगस्ट) गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाझेंनी (Sachin Vaze) केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पत्रदेखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. वाझे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. वाझे यांच्या याच दाव्यावर आता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
सचिन वाझे यांनी मला पत्र पाठवल्यांचं माध्यमांत दाखवण्यात आलंय. अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही. मी गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहे. सगळं पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन. पण जे समोर येईल त्यावर आम्ही योग्य ती चौकशी करू, असं फडणवीस म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत, असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते फार फ्रस्टेट झाले आहेत. या अस्वस्थतेत ते असे शब्द वापरत आहेत. यावर आपण काय उत्तर द्यायला हवं. नैराश्यात एखादी व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं नसतं, असे फडणवीस म्हणाले.
तसेच, अमित शाह यांनी औरंगजेब फॅन क्लब असा शब्द वापरला होता. उद्धव ठाकरे यांनी हे भाषण करून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.
देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले
दरम्यान,सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांच्यावर भाजपा तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तर खुद्द देशमुख यांनी वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यामुळेच अशा प्रकारचा कट रचला जातोय, असा दावा देशमुख यांनी केला.
हेही वाचा :
अहमद शाह अब्दालीचा वंशज म्हणजे अमित शाह, हे देखील शाह तो देखील शाहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात
फडणवीसांनींच वाझेंकडून पत्र लिहून घेतलंय, लोकांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न, सुषमा अंधारेचा थेट आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)