Navneet Rana | नवनीत राणांचं काय होणार? महायुतीकडून उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिली नेमकी उत्तरं!
अमरावती जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलंय.
अकोला : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षातील अनेक नेते प्रयत्नरत आहेत. त्यासाठी काही नेते हे दिल्लीची वारी करताना दिसतायत. तर काही नेते हे प्रादेशिक नेतृत्वाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या राज्यात बारामती, माळव, शिरुर यासह अनेक मतदारसंघ विशेष रुपाने चर्चेत आहेत. यात अमरावती (Amravati) या जागेचाही समावेश आहे. कारण या जागेवर सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) कोणाला संधी देणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावरच आता उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नेमकं सांगितलंय. ते आज (20 मार्च) अकोल्यात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
"अमरावतीचा उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढेल"
अमरावती या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) ही निवडणूक लढवणार आहेत. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपाला पुरक असलेली भूमिका घेतलेली आहे. महत्त्वांची विधेयकं मंजूर होताना त्यांनी सत्ताधारी भाजपाच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्या युवा स्वाभिमान पार्टीकडून निवडणूक लढवणार की महायुतीचा भाग म्हणून त्यांना भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याव बोलताना फडणवीस म्हणाले की,अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे. तेथे जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावर लढेल.
फडणवीसांच्या विधानामुळे संभ्रम कायम!
पुढे बोलताना सध्या नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या पूर्ण पाच वर्षे भारतीय जनता पार्टीसोबत होत्या. या पाच वर्षांत त्यांनी लोकसभेत अतिशय ताकदीने नरेंद्र मोदी आणि भाजपाची बाजू मांडलेली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच अंतिम निर्णय आमचा पार्लमेंट्री बोर्ड किंवा निवडणूक समिती घेते. त्यामुळे मी यावर अधिक काही सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी राणा यांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम कायम ठेवला.
15 मार्च रोजी रवी राणा, फडणवीस यांच्यात चर्चा
नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि राणा दाम्पत्य यांच्यात चर्चा चालू आहे. 15 मार्च रोजी फडणवीस यांनी नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना तातडीने नागपूरला बोलावून घेतलं होतं. त्यानंतर रवी राणा आणि फडणवीस यांच्यात दोन तास चर्चा झाली होती. या चर्चेनंतर नवनीत राणा यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे म्हटले जात होते.
फडणवीस, बावनकुळे महाराष्ट्र दौऱ्यावर
दरम्यान,देवेंद्र फडणवीस आज (20 मार्च) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे हेदेखील होते. पुढच्या काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे राज्यभरात नीट व्यवस्था लावण्यासाठी, स्थानिक परिस्थती समजून गेण्यासाठी, काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी फडणवीस आणि बावनकुळे हे महाराष्ट्रभर फिरत आहेत. भाजपा ही निवडणूक बुथपातळीवर लढवत आहे. त्यामुळे हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत.