(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepak Kesarkar: नारायण राणे केवळ एक व्यक्ती नव्हे तर कोकणचा विकास त्यांच्यावर अवलंबून; दीपक केसरकरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Maharashtra Politics:रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नारायण राणेंच्या दीपक केसरकरांचा पाठिंबा. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडून आला तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला होता.
सिंधुदुर्ग: आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये उमेवारीसाठी स्पर्धा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे वक्तव्य केले आहे. नारायण राणे (Narayan Rane) ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. ते सोमवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडून आला तर तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी म्हटले की, नारायण राणे ही फक्त एक व्यक्ती नाही, त्यांच्यासोबत आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास त्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळालेले नाही. ते लोकसभेवर निवडून आले तर ते मंत्री बनण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला मिळणारं केंद्रीय मंत्रिपद घालवायचे का, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मी नाही, माझं कसं आहे, एखादा संघर्ष झाला तर तो विषयापुरता मर्यादित असतो. आम्ही कोकणी लोक आहोत, आमचा जिल्हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. कोकणातील माणूस कधीच कोणाकडे मागत नाही, कर्जमाफी मागत नाही, फक्त कधीतरी मदतीची गरज लागते. पण विकासाची गंगा कोकणात येण्याची आवश्यकता आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेकडे असल्याचे सांगत शिंदे गट किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. मात्र, एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपक केसरकर यांनी राणेंच्या उमेदवारीला समर्थन दिल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या गुप्त बैठक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जुहू बंगल्यावर गुप्त बैठक पार पडली होती. मात्र, त्यानंतरही हा मतदारसंघ कोण लढवणार, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नव्हते. नारायण राणे हे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे नारायण राणे यांचे बालेकिल्ले मानले जायचे. पण सध्याच्या घडीला नारायण राणे यांनी ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित झाली आहे. रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाचे नेते नारायण राणे यांना कितपत पाठिंबा देतील, याबाबत शंका आहे. त्यामुळे नारायण राणे सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आणखी वाचा
नारायण राणे संसदेत बोलायला उठतात अन् तोंडघशी पडतात; लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांनी पडतील: विनायक राऊत