Deepak Kesarkar meet Narayan Rane : दीपक केसरकर तब्बल 12 वर्षांनी कट्टर विरोधकाच्या घरी, नारायण राणे काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात राणेंच्या कणकवली (Kankavli) निवासस्थानी एक तास चर्चा झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्ना सोबत इतरही विषयावर चर्चा झाली.
सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तब्बल 12 वर्षानंतर एकेकाळचे कट्टर शत्रू आणि सध्याचे राजकीय मित्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. कोकणातील या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एकेकाळी एकमेकांना पाण्यात बघणारे कट्टर शत्रू भेटल्याने त्याची चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात राणेंच्या कणकवली (Kankavli) निवासस्थानी एक तास चर्चा झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्ना सोबत इतरही विषयावर चर्चा झाली. दीपक केसरकर हे 12 वर्षानंतर राणेंच्या निवासस्थानी जात भेट घेतली. मात्र एकेकाळी टोकाचे राजकीय विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आल्याने जिल्ह्यात चर्चांना मात्र उधाण आलं आहे.
केसरकर आण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. हे दोघे तब्बल 12 वर्षानंतर राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेटले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र आपण घेतलेली भेट ही जिल्ह्याच्या विकासासाठी असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता
दरम्यान, राणे आणि केसरकर हा संघर्ष वैयक्तिक कधीच नव्हता तर तो राजकीय संघर्ष होता. वैचारिक संघर्ष होता शारीरिक संघर्ष नव्हता असं केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगितलं. आम्ही मुंबईलाही समोर आलो, भेटलो. आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत. मतभेद वगैरे नाहीत. तुम्ही दाखवा आमच्यात कधी मतभेद होते. त्यांनी सांगावं कधी आले भेटले नाहीत असं कधी झालं नाही. शेवटी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. डीएडचा कायमस्वरुपी परमनंट जॉबचं व्हावं, जो निर्णय रत्नागिरीला झाला तो इथेही व्हावा, असं नारायण राणे म्हणाले.
दीपक केसरकर काय म्हणाले?
राणेसाहेबांची भेट नेहमीच जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातच असते आणि त्याच्यामुळे चांगलं मार्गदर्शन हे विकासाच्या संदर्भात ते करत असतात. लवकरच आम्ही एकत्र बसून नवीन नवीन काय करायचे जिल्ह्यांमध्ये याच्याबद्दल चर्चा करू. आज या निमित्ताने काही डीएड बेरोजगार हे राणेसाहेबांना भेटायला आले होते म्हणून त्यांनी मला फोन केला. म्हणून मी मुद्दाम इथे आलो. त्यांच्या काही वेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत. एकदा डीएड झाल्यानंतर त्यांना टीईटी देता आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे या संदर्भात रत्नागिरीमध्ये जसं तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर काही लोक काम करतात, तसेच तासिका तत्त्वावर काम करायची तयारी आहे का त्यांची त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी बहुतेक लोकांनी तशी तयारी दाखवली. तशी जर तयारी असेल तर मग आम्ही नवीन ज्युनिअर सीनियर केजी सुरू करतोय. त्याच्यामध्ये असा प्रस्ताव करता येईल का त्याच्या संदर्भात मी डिपार्टमेंटशी बोलून तो अर्थ खात्याकजे तो प्रस्ताव पाठवू. नंतर राणेसाहेबांनी म्हटले की आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू की जेणेकरून जे डीएड बेरोजगार आहेत त्यांना घरी शिक्षकांची परमनंट नोकरी मिळू शकत नसली, कारण प्रत्येकाला परमनंट मिळू शकणार नाही.
उरलेल्या लोकांनी काय करायचं हा प्रश्न येईल यासाठी त्यांच्या गावातल्या गावात त्यांना काय करता येईल का तात्पुरत्या स्वरूपात? नंतर त्यांना परमनंट ठिकाण मिळेल तर ते जाऊ शकतात पण गावातल्या गावात थोड्याफार कमी खर्चामध्ये जरी त्यांची व्यवस्था होऊ शकली, तर ती सध्याची आमची प्री प्रायमरी सुरू होते तिथल्या स्वरूपाची काय अरेंजमेंट करता येईल का याच्या संदर्भात रत्नागिरीत जसं 9 हजार मानधनावर केलेलं आहे, तसं काही केलं तर ते तासिका तत्त्वावर आहे,ते घेता आलं तर निश्चित विचार करु.
केसरकर-राणे वादाची पार्श्वभूमी
दीपक केसरकर आणि नारायण राणे हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते. केसरकर आणि राणे हे एकाच जिल्ह्यातील दोन नेते, मात्र दोघांमध्ये टोकाचा संघर्ष.शिवसेनेत असताना दीपक केसरकर यांनी राजकीय दहशतवाद असं म्हणत कायमच राणे यांना लक्ष केलं होतं. गेल्या वर्षीही ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर, अन्य नेत्यांचे वाद मिटले होते, मात्र राणे-केसरकर वाद उफाळून आला होता. राणे केसरकराच्यां पारंपारिक वादात निलेश राणे यांनीही उडी घेत, केसरकरांवर टोकाची टीका केली होती.
राजकीय वैराला सुरुवात
दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचं राजकीय वैर हे सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासूनच होतं. दीपक केसरकर हे 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात समेट घडवून आणला होता. तसंच पवारांनी नारायण राणेंना दीपक केसरकर यांना मदत करण्यास सांगितले होते. त्यामुळेच दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले असा राणेंचा दावा होता.
दीपक केसरकर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे आणि केसरकर यांचं सख्ख्य नव्हतं. त्यामुळेच नेहमी राणेंच्या विरोधात बोलणारे दीपक केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेत गेले आणि त्यानंतर 2014 पासून आतापर्यंत दीपक केसरकर यांनी नेहमी नारायण राणे आणि कुटुंबीयांनी जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप करत राहिले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा प्रचार करावा लागणार म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत उडी मारली असा आरोप राणेंचा आहे. याचं कारण म्हणजे राणेंनी 2009 मध्ये दीपक केसरकर यांना मदत केली होती. त्यामुळे आधीच राणे आणि शिवसेना यांचं राजकीय वैर होताच. त्यात दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेच्या विरोधात बोलण्यास केसरकरांना खुलं मैदान मिळालं. त्यामुळे 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर नेहमी राणेंच्या विरोधात बोलत असताना दहशतवाद या मुद्द्यावर बोलत राहिले.
नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत फटका
दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेनेच्या वतीने दीपक केसरकर यांनी नेहमी राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा प्रचारात आणला. नारायण राणे यांना याचाच फटका विधानसभा निवडणुकीत बसला आणि राणेंचा पराभव झाला. हाच पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही जिल्ह्यात कुठेही जाहीर व्यासपीठावर राजकीय भाषण करताना 2014 च्या पराभवाचा शल्य बोलून दाखवतात. हेच कारण आहे की राणे आणि केसरकर यांचं राजकीय वाद आहेत.
संबंधित बातम्या