"महाविकास आघाडी सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल", झारखंड सरकारचे नाव घेत अजित पवार यांची खोचक टीका!
राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
मुंबई : राज्याची विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजना लागू केली. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची चर्चा चालू आहे. तर दुसरीकडे याच योजनेच्या वेगवेगळ्या तरतुदींवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसतायत. या योजनेमुळे महायुतीच्या घटकपक्षांना महिलांची मते मिळतील, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांना आहे. दरम्यान, याच योजनेचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधातील महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. झारखंडमधील महाविकास आघाडी सरकार आमच्याच योजनेची नक्कल करत आहे, असा दावा अजित पवार यांनी केलाय.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर विरोधकांवर टीका केली आहे. "झारखंडमधील महाविकास आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे, हे सपशेल दिसतंय. भक्कम अर्थव्यवस्था आणि महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आम्ही योजना दीर्घकाळ राबवूच. मात्र महाविकास आघाडीनं झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे कशी राबवता आणि टिकवता येईल याची काळजी करावी," असे अजित पवार म्हणाले.
झारखंडमधील महाविकास आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे हे सपशेल दिसतंय. भक्कम अर्थव्यवस्था आणि महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आम्ही योजना दीर्घकाळ राबवूच. मात्र महाविकास आघाडीनं झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 4, 2024
झारखंड सरकारची योजना नेमकी काय आहे?
महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडच्या सरकारनेही महिलांना आर्थिक मदत करणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'झारखंड मुख्यमंत्री मंइयाँ सन्मान योजना' असे आहे. या योजनेच्या माध्यमातून एकूण 50 लाख महिलांना प्रतिमहिना 1000 रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेचा महिलांना लाभ मिळावा यासाठी झारखंड सरकारने एक पोर्टल लॉन्च केले आहे. 3 ऑगस्टपासून या पोर्टलवर महिलांना अर्ज करता येणार आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 50 वर्षांदरम्यान आहे, अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा :
‘लाडकी बहीण योजने'चा शुभारंभ, स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला भगिनीचा फॉर्म