Dattatray Bharne: दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार; फडणवीसांच्या भेटीनंतर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, राज्यात प्रत्येक ठिकाणी...'
Dattatray Bharne: शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.

Dattatray Bharne : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आणि दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आज दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.
तर पुढे भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. मी पूर्णपणे मदत करेन असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते मी करणार आहे, अशी ग्वाही देखील भरणेंनी दिली आहे, तर राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच कृषी विभागातील MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या 14 जणांची नियुक्ती करणाऱ्या पत्रावर त्यांनी सही केली आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे वक्तव्यामुळे चर्चेत
राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान केलं, त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तर अनेकांनी या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलंय.
दत्तात्रय भरणे यांची राजकीय कारकीर्द
दत्तात्रय भरणे यांचा जन्म पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली असून, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं आहे. 1992मध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले, तर 1996 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करू लागले. 2000मध्ये त्यांनी या बँकेचे अध्यक्षपद भूषवले आणि 2002मध्ये ते साखर कारखान्याचे प्रमुख बनले. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व यामुळे त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली.
भरणे यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी 2019मध्ये पुन्हा हाच मतदारसंघ जिंकला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा भरणे यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देत आपली निष्ठा दाखवली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा इंदापूरमधून निवडणूक लढवली आणि शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील तसेच अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा 19,410 मतांनी पराभव केला.

























