Sandhya Sawalakhe : रूपाली चाकणकरांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Sandhya Sawalakhe On Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम (EVM) मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. रुपाली चाकणकर यांनी आज मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने अल्पावधीतच हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला. त्यानंतर त्यांच्या या वायरल व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात नवा वादंग उठला आहे.
परिणामी या प्रकरणाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनीच त्यांच्याविरोधात तक्रार दिली असून आता रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या विरोधात अनेकांनी टीकेची झोड उठवत रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (sandhya-sawalakhe) यांनी रूपाली चाकणकर यांना तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, अशी मागणी करत बोचरी टीका केली आहे.
चाकणकर यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा- संध्या सव्वालाखे
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनची पूजा केली, त्यांचे अशा पद्धतीने वागणं हे वाड्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेल, अशी बोचरी टीका संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. गेल्यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातून पक्षाचा प्रचार केला होता. तेव्हा त्यांची कीव आली होती. त्यावेळी असे वाटलं होतं की त्या असे कृत्य कुणाच्यातरी सांगण्यावरुन आठवा दडपणाखाली करत असतील. मात्र आजचे कृत्य म्हणजे खरंच त्यांच्या डोक्यात फरक पडल्याचे लक्षण आहे. तसेच हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभण्यासारखे असल्याचेही संध्या सव्वालाखे म्हणाल्या.
भविष्यात आयोगाकडे एखादी महिला दाद मागण्यासाठी गेल्यास तिला न्याय मिळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रूपाली चाकणकर यांची तात्काळ दखल घेऊन त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केलीय.
नेमकं प्रकरण काय?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज धायरी परिसरातील एका मतदान केंद्रावर सहकुटुंब पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली, त्यासाठी त्यांनी सोबत आणलेल्या एक ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली, औक्षण केलं. त्यानंतर हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैदही केला आणि नंतर सोशल मिडियावर पोस्टही केला. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या