'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर', शायरीतून शशी थरूर यांनी काय दिला संदेश?
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता वेग आला असून पक्षातील अनेक बडे नेते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत.
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता वेग आला असून पक्षातील अनेक बडे नेते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत. खासदार शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे भेट घेतली होती. यातच आज माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तेही ही निवडणूक लढाऊ इच्छित असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याच दिवशी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा यापूर्वीच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली आहे.
मजरूह सुल्तानपुरी यांची शायरी केली ट्वीट
आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एक ट्वीट करून अप्रत्यक्षपणे दावा केला की, त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे वर्तुळ वाढत आहे. त्यांनी ट्वीट केले की, "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया." या ओळी प्रसिद्ध कवी आणि गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांच्या आहेत.
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 28, 2022
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
~ Majrooh Sultanpuri
मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना त्यांच्या प्रतिनिधीच्या वतीने शशी थरूर यांच्या उमेदवारीबाबत माहिती देण्यात आली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, शशी थरूर यांनी सर्वप्रथम निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली होती. राहुल गांधींनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयानंतर अशोक गेहलोतही या शर्यतीत सामील झाले.
निवडणूक वेळापत्रक
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच 24 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.