भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसची खेळी, खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मराठा कार्ड?
Khamgaon Vidhansabha Election : काँग्रेसने मनोज जरांगे समर्थक व नवीन चेहरा देण्याचं ठरविल्याने आता काँग्रेसचे नेते धनंजय देशमुख यांनी खामगाव मतदार संघावर दावेदारी ठोकली आहे.
Khamgaon Vidhansabha Election : काँग्रेसचा गड असलेल्या खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी काँग्रेसने सावध भूमिका घेत मराठा कार्ड व नवीन चेहऱ्याला संधी देण्याची भूमिका घेतल्याचं समोर आल आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस नेते दिलीप सानंदा तीन वेळेस लोकप्रतिनिधीतत्व केलं होतं. या मतदार संघात गेल्या दोन निवडणुकात भाजपाच्या आकाश फुंडकर यांच्याकडून काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेसने मनोज जरांगे समर्थक व नवीन चेहरा देण्याचं ठरविल्याने आता काँग्रेसचे नेते धनंजय देशमुख यांनी खामगाव मतदार संघावर दावेदारी ठोकली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांनी कालच मराठा आंदोलन मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याचं सूतोवाच केल्यावर आता अनेक पक्षातील जरांगे समर्थक चर्चेत आले आहेत. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदार संघात मराठा फॅक्टर व नवीन चेहरा दिल्याने किती यश मिळेल? मनोज जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना भाष्य केलं आहे.
शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) मराठा कार्ड खेळणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच बीड परळी या भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला. राज्यात मराठा आरक्षणाचा बीड, जालना हा भाग केंद्रबिंदु ठरला होता. त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या