Manikrao Gavit : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार
Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक (Nashik) येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी म्हणजेच उद्या सकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा इथल्या एका गरीब आदिवासी सामान्य कुटुंबात माणिकराव गावित यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील होडल्या बोंडा गावित हे एक गरीब शेत मजूर होते. त्यामुळे माणिकराव गावित यांचं बालपण अतिशय खडतर आणि कष्टमय गेलं. सुरुवातीपासूनच नेतृत्वाचे गुण अंगी असल्यामुळे आणि आदिवासी समाजावर त्याकाळात होणाऱ्या अन्याय, अत्याचारामुळे पेटून उठलेला युवक म्हणून त्यांनी आपले राजकीय कार्य नवापूर गावात आणि परिसरात सुरु केली. परिणामी 1965 साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. तिथूनच त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जंगल कामगार सोसायट्यांमध्ये काम करणारा काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
माणिकराव गावित यांची राजकीय वाटचाल
- नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे 29 ऑक्टोबर 1934 रोजी त्यांचा जन्म झाला.
- त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रिकपर्यंत झाले.
- 1965 साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले
- धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आलेत.
- 1971 ते 1978 साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले
- 1980 साली नवापूरचे आमदार झाले
- माणिकराव गावित हे 1981 साली प्रथमच खासदार झाले, त्यावेळी त्यांचे 47 वय होते
- तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 9 वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
- 1999 साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना 1.30771 इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या टॉपटेन खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झाले.
- 1981 ते 2009 हा माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.
- 1981-82 मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. 1980 ते 1984 या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
- 1990 ते 1996, 1998-99 तसेच 2000 या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गिक वायू या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. 1991 ते 93 आणि 1999 ते 2000 या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.
- 1998-99 या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. 1999 ते 2001 या काळात अनु. जाती व अनु.जमाती कल्याण समितीचेही सदस्य होते. 1990-91 आणि 1999-2000 या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते.
- सोनिया गांधी यांनी त्यांना 22 मे 2004 रोजी डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले.