Gajanan Kirtikar: आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, आमचं मत विचारात घेतलं पाहिजे; जागावाटपाच्या मुद्द्यावरुन गजानन कीर्तिकर वैतागले
Maharashtra Politics: मी शिवसेनेचा महत्त्वाचा नेता, लोकसभा जागावाटपाच्या चर्चेवेळी एकनाथ शिंदेंनी आमचं मत विचारलं पाहिजे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही.
मुंबई: आगामी लोकसभा जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीमधील घटकपक्षांमध्ये सध्या एकमेकांविषयी काहीसे नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच सूत्रांच्या हवाल्याने महायुतीच्या जागावाटपाचा एक फॉर्म्युला समोर आला होता. यामध्ये भाजपच्या वाट्याला 32, शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाने 4 जागांवर लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु, या फॉर्म्युलावर शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली होती. याबाबत गजानन कीर्तिकर यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, सध्या महायुतीच्या जागावाटपाच्या ज्या फॉर्म्युलाची चर्चा आहे, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लोकसभा जागावाटपाची चर्चा कोण करतंय? त्याबाबत कोण निर्णय घेत आहे, हे कळायला काहीच मार्ग नाही. मी तर एक नेता आहे. शिवसेनेची भूमिका ठरवताना माझ्यासोबत असणाऱ्या नेत्यांशी मुख्य नेते जागावाटपाची चर्चा करत असतील, अशी अपेक्षा आहे. पण ते काही झालेले नाही. आम्हाला १२ जागांचा प्रस्ताव अजिबात मान्य नाही. २०१९ च्या आकडेवारीनुसार आमचा क्लेम २२ जागांचा आहे. त्यावेळी भाजपने २६ जागा लढवल्या होत्या. तेव्हा भाजपचे तीन खासदार, तर आमचे चार खासदार पराभूत झाले होते. पण आता आमच्यात एक नवीन सहकारी आला आहे. त्यांना थोड्या जागा द्याव्या लागतील. त्यामुळे या जागा शिवसेना आणि भाजपने आपापल्या कोट्यातून समसमान पद्धतीने द्याव्यात. जागावाटप हे अशाचप्रकारे झाले पाहिजे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
आमच्या १३ खासदारांचं संरक्षण करणे हे एकनाथ शिंदेंचे काम: कीर्तिकर
आमच्या पक्षात सध्या लोकसभेचे १३ खासदार आहेत. त्यांचे संरक्षण करणे हे एकनाथ शिंदे यांचे काम आहे. त्यांना दगाफटका होणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यावर आता भाजप आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार, हे बघावे लागेल.
आणखी वाचा
आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, एकनाथ शिंदेंचा खासदार आक्रमक