CM Eknath Shinde : जरांगेंच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली; मुख्यमंत्र्यांचा जरांगेवर घणाघात
Maharashtra Assembly Session : मनोज जरांगे पाटीलांच्या मागण्या सतत बदलल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी सरसकट प्रमाणपत्र देता येणारं नाही, हे मी त्यांना स्पष्टं सांगितलं होतं. सगेसोयरेचा मुद्दा त्यानंतर आला. त्यांच्या सातत्यानं मागण्या बदलत गेल्या, त्यानंतर ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. कुणी दगड जमा केले, कुणी दगड मारले ह्याचा अहवाल पोलिसांकडे आहे, आता सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली'
मी दोन वेळा एवढ्या संख्येने आलेल्या मराठा समाजाला सामोरा गेलो. मला मनोज जरांगे यांच्याशी काही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली. असं कुठं चालतं का? एकेरी पद्धतीने बोलणं हे शोभत का? मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची भाषा नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे. जाती-जातीत भांडण करण्याचा प्रयत्न आहे, हे लक्षात आलं. जी अधिसूचना काढण्यात आली, त्यावर साडे सहा लाख हरकती आल्या आहेत, असं मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिंदेची महाविकास आघाडीवर टीका
मनोज जरांगे यांची भाषा कुणाची आहे, यावर बोलणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, कायदा सर्वांना पाळावा लागेल. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात येऊं देणार नाही, असं ते म्हणाले. तुमच्या गाड्यांवर हल्ला झाला तर, सरकार तुमच्या पाठीशी उभा राहील. नारायण राणे यांना ताटावरुन उचललं. एवढं काय मोठा गुन्हा होता. नवनीत राणाला हनुमान चालिसा वाचायची होती तर, 12 दिवस जेलमध्ये टाकलं, कंगना राणावतच घर तोडलं, असं म्हणत शिंदेंनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
आघाडी सरकारने आरक्षण कोर्टात टिकवलं नाही
मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, मात्र त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो. ओबीसी समाज आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणारं अशी भूमिका मी घेतली. आम्ही जोपर्यंत सत्तेत होतो, तोपर्यंत आरक्षण कोर्टात टिकलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सारथी सुरू केलं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जीवदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सोयीसुविधा दिल्या जातील याची घोषणा केली, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.