मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार?
CM Eknath Shinde Delhi Visit: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
CM Eknath Shinde Delhi Visit: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. आता ते उद्या म्हणजेच गुरुवारी 28 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर जाऊ शकतात. मुख्यमंत्री शिंदे रात्री 9 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचणार होते. तसेच ते गुरुवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच वेळा शिंदे यांची दिल्लीवारी
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत पाच दिल्ली दौरे झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती, जे पी नड्डा, राजनाथ सिंग आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसऱ्यांदा 8 जुलै रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अभित शाह यांची भेट घेतली. तिसऱ्यांदा ते 18 जुलै रात्री दिल्लीला रवाना झाले आणि 19 जुलै रोजी दिल्लीत शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर 22 जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. यानंतर 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते.
अशातच शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येऊन जवळपास महिना उलटला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी 7 वाजताच्या विमानाने दिल्लीला रवाना होणार होते आणि रात्री 9 वाजता महाराष्ट्र सदनात पोहोचणार होते. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज दिल्लीला जाणार होते. मात्र त्यांचाही दौरा रद्द झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांचा देखील दिल्ली दौरा रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.