''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा राज्यभरात होत आहे
मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री (Chief minister) माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या राज्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत असून महिलांनी सेतू कार्यालयाबाहेर आणि संबंधित कार्यालयाबाहेर योजनेचा अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून अधिक चांगल्या, सहज व सुलभपणे ही योजना राबविण्यासाठी नियमांत काही अनुकूल बदलही करण्यात आले आहेत. दुसरीकडे या योजनेचं स्वागत करताना विरोधकांनी राज्य सरकारला टोलाही लगावला. त्यावरुन, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सभागृहातूनच पलटवार केला आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा राज्यभरात होत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचं स्वागत करताना सत्ताधाऱ्यांना टोमणाही मारला होता. लाडक्या बहिणींसाठी योजना आली, त्याचं स्वागत पण लाडक्या भावांसाठीही योजना आणावी, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यावरुन, आता मुख्यमंत्री शिंदेंनी टोला लगावला आहे.
काही लोकं म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, लाडक्या भावांचं काय?, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना लाडकी बहिण योजना कशी काय कळायची, असा जोरदार पलटवार एकनाथ शिदेंनी ठाकरेंवर केला. तसेच, आम्ही तेही केलंय. लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे. राज्यातील 10 लाख मुलांना अप्रेंटीशीप आम्ही देतोय, 10 हजार ते 8 हजार रुपये दरमहा या तरुणांना मिळणार आहेत. त्याची अंमलबजावणी तत्काळ होण्यासाठीची व्यवस्था देखील आम्ही करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फोटोग्राफर्स म्हणत ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, योजना मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीचे फोटो काढले पाहिजेत, खरंतर या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर्सही आहेत. त्यांनी रियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचेही फोटो काढले पाहिजेत, ही गर्दी पाहून त्यांचे चेहरेही फोटो काढावेत असेच होतील, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आता ६५ वर्ष करण्यात येत असल्याची आणि पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज विधानसभेत केली. जनतेचा विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या वाटचालीची त्रिसूत्री असल्याचेही… https://t.co/6rFOV7rYCV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
पैशाची मागणी केल्यास कारवाई
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे, जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.