Chhagan Bhujbal : राजकारणामुळे जे कुटूंब फुटले, ते एकत्र आले तर...; ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Chhagan Bhujbal on Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलंय.

Chhagan Bhujbal on Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका मुलाखतीत मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी सर्वांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जुनी भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
छगन भुजबळ म्हणाले की, दोघांची काय मतं आहेत? याची मला कल्पना नाही. अनेकांची मात्र इच्छा आहे की, दोघांनी एकत्र यावे. 2014 मध्ये एकत्र येण्याची संधी त्यांना होती. संधी चालून आली होती. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही.मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत. दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. राज ठाकरे यांची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
त्यांना बाळकडू घरातूनच मिळालंय
प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिणेकडे सगळीकडे प्रादेशिक पक्ष हवेत. राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत जातात. जेवण करतात आणि नंतर सांगतात भोजनावर चर्चा झाली. माझा त्यावर विश्वास नाही, राजकीय चर्चा होतच असते. प्रादेशिक पक्षाचे सरकार बनवितात. दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे, असेही त्यांनी त्यांनी म्हटले.
राजकारणामुळे जे कुटूंब फुटले, ते एकत्र आले तर...
तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे बंधू यांच्यानंतर पवार काका-पुतणे एकत्र येतील का? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, सगळी कुटूंब एकत्र आली तर सर्वांना आनंद होतो, सर्वांनी एकत्र यावे. राजकारणामुळे जे जे कुटूंब फुटले, त्यांनी एकत्र आले तर आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























