Narayan Rane Adhish Bungalow : माझं घर यांना दिसतं, मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही: नारायण राणे
Rarayan Rane : मुंबई महानगरपालिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा चालवण्याची शक्यता आहे.
Rarayan Rane : मुंबई महानगरपालिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा चालवण्याची शक्यता आहे. यावरच बोलताना नारायण राणे म्हणाले की, महानगर पालिकेने जी नोटीस पाठवली आहे, ती सूडबुद्धीने पाठवण्यात आली आहे. मुंबईतील 90 टक्के बांधकाम हे बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील अनेक बांधकामंही बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील बेहरामपाडा हा पूर्ण बेकायदेशीर आहे. मात्र तिथे हात टाकायची सरकारची हिम्मत नाही आहे, असं राणे म्हणाले आहेत.
राणेंना पालिकेची 15 दिवसांची मुदत
याच दरम्यान, राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात असून त्यांना योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. तसं न केल्यास 15 दिवसानंतर त्यांच्या बंगल्यावर कारवाई होऊ शकते. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले आहेत की, ''माझ्या घरात मला सर्व अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर मी घरात प्रवेश केला आहे. बेकायदेशीर असं काहीच नव्हतं. तरी यांनी नको ते कारण देत नोटीस दिली. आम्ही ते नियमित करण्यासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र हे राजकारण आहे. कायदेशीर कारवाई नाही. महापालिका आयुक्तांना एकच माझंच एक घर दिसतंय. इतर ठिकाणी फिरताना ते डोळे झाकून फिरतात. मुख्यमंत्रीही तसेच. ही सुडाची कारवाई असून देशात लोकशाही आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.''
आमचं घर दिसत मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत उतरवावे असं अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले आहेत की, राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे, त्याचं मी समर्थन करतो. भोंग्याला विरोध नाही मात्र बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते म्हणाले आहेत. मग बेकायदेशीर भोंगे का ठेवावेत. आमचं घर अनधिकृत यांना दिसतं, मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही.''