K. Chandrashekar Rao: 'दुबई शेखर' ते सत्तेचं शिखर... के चंद्रशेखर उर्फ KCR यांच्या संघर्षाचा वादळी प्रवास
K. Chandrashekar Rao History: लोकांना दुबईत नोकरी लावण्याचं काम ते तेलंगणाचा मुख्यमंत्री... आता महाराष्ट्रात सिंघम स्टाईल एंट्री. के चंद्रशेखर राव आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भिडू असतील.
मुंबई: एकामागोमाग येणाऱ्या 600 गाड्यांचा ताफा, त्यात सगळे पांढरे कपडे घातलेले राजकारणी... अन् हे सगळं पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी. साऊथच्या चित्रपटात हमखास दिसणारे हे दृश्य महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदाच लाईव्ह अनुभवले. निमित्त होतं ते तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao in Maharashtra) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ही सिंघम स्टाईल एन्ट्री मारलीय. पण केसीआर यांचा इतिहास (K. Chandrashekar Rao History) आपल्याला माहिती आहे का? लोकांना दुबईला नोकरी लावणारा, दुबई शेखर (K. Chandrashekar Rao Dubai Shekhar) नावाने ओळखला जाणारा हा व्यक्ती आता तेलंगणाच्या राजकारणातला जादुई नेता आहे आणि त्याला आता भारतभर आपलं राजकारण विस्तारायचं आहे. त्याला त्याने सुरूवातही केलीय... तीही महाराष्ट्रातून.
कलवाकुंतला चंद्रशेखर राव उर्फ केसीआर (Kalvakuntla Chandrashekar Rao) ही 1954 साली जन्मलेली व्यक्तीच भन्नाट. त्याला नऊ भाऊ आणि एक बहीण. त्यावेळी लोकांना दुबईचं आकर्षण, दुबईला नोकरी मिळणं म्हणजे बक्कळ पैसा असा समज. त्यातूनच लोक कोणत्याही परिस्थितीत दुबईला जायला तयार. हैदराबादमधील या लोकांना नोकरीसाठी दुबईला पोहोचवण्याचं काम एक तरुण करत होता, तो म्हणजे केसीआर (KCR). सडपातळ बांधा, एका बाजूला पाडलेला भांग आणि भेदक नजर... साऊथच्या जुन्या चित्रपटात हिरो असतो तसंच हे व्यक्तिमत्व. पण या व्यतिरिक्त या गड्याला काहीतरी वेगळं करायची खुमखुमी जास्त. त्यावेळी त्याने उस्मानिया विद्यापीठातून तेलगु साहित्यात (MA in Telagu Literature) एमए केलं होतं.
सत्तरच्या काळात देशातील राजकारणात प्रचंड उलथापालथी होत होत्या. इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) त्यावेळी देशभर करिश्मा होता. त्याचमुळे केसीआर यांनी युवक काँग्रेस जॉईन केलं. लोकांशी असलेल्या संपर्कामुळे केसीआर हे आंध्रच्या राजकारणातले जादुगार समजले जाणारे एन टी रामा राव (N T Rama Rao) यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी त्यांना तेलगू देसम पार्टीमध्ये (Telugu Desam Party - TDP) सामील करुन घेतलं. केसीआर यांच्या खऱ्या राजकारणाला आता सुरूवात झाली.
सन 1981 साली केसीआर यांना विधानसभेचं तिकीट दिलं पण त्यांचा पराभव झाला (KCR First Election). पण हा गडी खचला नाही. पुन्हा जोमाने काम करुन केसीआर यांनी 1985 सालची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या विजयापासून केसीआर यांच्या राजकीय विजयाची घोडदौड सुरू झाली आणि त्यांनी मागे कधीच वळून पाहिलं नाही.
एन टी राम राव (NTR History) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात केसीआर यांना स्थान दिलं. पण नंतरच्या काळात एनटी आर यांचे यांचे जावई चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. चंद्राबाबू यांनी केसीआर यांची महत्त्वाकांक्षा ओळखली आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता विधानसभेचे उपसभापतीपद दिलं आणि त्यांचं महत्व कमी केलं.
Telangana Movement Protest History : वेगळ्या तेलंगणाची निर्मिती
तेलगु भाषिक लोकांचे वेगळे राज्य असावे या मागणीवरुन आंध्रची निर्मिती (Andhra Pradesh History) झाली होती. पण त्यातही वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती व्हावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीला आता फुंकर दिली ती केसीआर यांनी. या विषयावरुन त्यांनी तेलगु देसम पक्षाला रामराम केला आणि 2001 साली तेलंगणा राष्ट्र समितीची (Telangana Rashtra Samithi - TRS) स्थापना केली.
वेगळ्या तेलंगणाच्या (Separate Telangana State) राज्याची मागणी करत केसीआर यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि 2004 सालची निवडणूक लढवली. पक्षाचे 25 आमदार आणि पाच खासदार निवडून आले. पण अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसच्या यूपीए (Congress UPA Govt) सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद घेतलं.
वेगळ्या तेलंगणाचा मुद्दा काहीसा मागे पडत असल्याचं चित्र असताना 2006 साली त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा (KCR Resigned as Minister) आणि खासदारकीचा राजीनामा दिला. याच मुद्द्यावर त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आले. 2008 साली त्यांच्या पक्षाच्या तीन खासदारांनी आणि 16 आमदारांनी वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीला सामोरे गेले.
Telangana Movement Protest: आमरण उपोषणाला सुरूवात
ऑक्टोबर 2009 साली वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावर केसीआर यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली. वेगळा तेलंगणा मिळाला नाही तर मी मरण पत्करेन असा इशारा त्यांनी दिला. केसीआर यांची प्रकृती खालावली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्याला त्यांनी सोडलं नाही.
केसीआर यांची दोन्ही मुलं अमेरिकेत नोकरीला होती, तिकडेच स्थायिक झाली होती. त्यामुळे आपण फक्त वेगळ्या तेलंगणासाठी लढतोय... आपल्याला बाकी काहीच नको, फक्त दोन वेळचं जेवण पुरेसं आहे अशी त्यांनी लोकांना भावनिक साद घातली. केसीआर यांच्या उपोषणाचं लोण उस्मानिया विद्यापीठात पोहोचलं. उस्मानिया विद्यापीठात संपूर्ण आंध्रमधून मुलं शिकायला यायची. त्यातही शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मुलांचा भरणा जास्त. त्यामुळे राज्याबरोबरच उस्मानिया विद्यापीठातील पोरांनी हे आंदोलन पेटवलं.
केसीआर हे तेलगु साहित्यात एमए झालेले. त्यांनी लोकभाषेत अनेक कविताही रचलेल्या. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या अनेक कविता या लोकांना भावल्या. लोकांनीही केसीआर यांना डोक्यावर घेतलं. शेवटी 2014 साली केंद्रातील काँग्रेस (Congress) सरकारने वेगळ्या तेलंगणाची घोषणा (Formation of Telangana) केली.
History of Telangana : तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री
वेगळ्या तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला यश मिळालं. त्यांच्या 63 जागा निवडून आल्या आणि वेगळ्या तेलंगणा चळवळीचे हिरो केसीआर मुख्यमंत्री ( First CM of Telangana) बनले. त्यानंतर मात्र केसीआर यांनी शेतकरी आणि गरिबांसाठी लोकोपयोगी योजना (Telangana Schemes For Farmers) राबवल्या. आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा त्यांनी सपाटा लावला आणि त्याचं फलित म्हणून 2018 साली त्यांना 88 जागा मिळाल्या, ते पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
Bharat Rashtra Samithi History : राष्ट्रीय राजकारणाकडे डोळे, पक्षाच्या नावात बदल
तेलंगणामधील सत्ता मिळवणाऱ्या केसीआर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही अंगावर घेतलं. एकीकडे मोदी लाट असताना दुसरीकडे विरोधकांकडे कोणताही चेहरा नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढाई लढली पाहिजे यावर आता विरोधकांचे एकमत झाल्याचं दिसतंय. 1977 प्रमाणे यावेळीही काहीतरी बदल होईल आणि विरोधकांच्या आघाडीला सत्ता मिळेल असंही काहीजणांना वाटतंय.
देशातील राजकारणात एन्ट्री करायची असेल तर हीच संधी आहे... आणि ही संधी साधायची याच उद्देशाने आता केसीआर यांनी देशाच्या राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं ते म्हणजे त्यांच्या पक्षाचं नाव बदल. तेलंगणा राष्ट्र समिती आता भारत राष्ट्र समिती ( Bharat Rashtra Samithi) झालीय. याच माध्यमातून केसीआर यांनी आता विरोधकांची जागा व्यापायचं ठरवलंय.
K Chandrashekar Rao Maharashtra Visit: महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री
शेतकरी आणि ग्रामीण भागातील मतदान हेच केसीआर यांचं लक्ष्य... तेच डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी वाटचाल सुरू केलीय. शेतातील कामं आटोपून वारकरी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला (Ashadhi Wari 2023)येतात, त्या ठिकाणी लाखो वैष्णवांचा मेळा भरतो, ही गोष्ट केसीआर यांनी हेरली आणि पंढरपूरकडे कूच (KCR In Pandharpur Wari) केली... तीही आपल्या स्टाईलमध्ये.
राज्याच्या राजकारणात (KCR Maharashtra Visit Latest News) प्रवेश करण्यासाठी केसीआर यांनी अनेकांना गळाला लावायला सुरूवात केलीय. ज्यांना सक्रिय राजकारणात सध्या संधी मिळत नाही त्यांनी केसीआर यांच्या पक्षाकडे धाव घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवायचे या निर्धाराने केसीआर पावलं टाकत असल्याचं चित्र आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे राजकारणातले मोठे मासे गळाला लावण्याचे केसीआर यांचे प्रयत्न नक्कीच असतील.