BMC Election 2026: भाजप मुंबईत 150 जागा लढणार? शिवसेनेला किती जागा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिंदे सेनेची पहिलीच बैठक, इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती
BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिलीच बैठक पार पडणार आहे.

BMC Election 2026: राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा (Municipal Election 2026) कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election 2026) भाजप (BJP) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shiv Sena) यांची महत्त्वपूर्ण पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये महापालिकेतील सीट वाटाघाटी, प्रचार रणनीती आणि संभाव्य उमेदवारांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 150 हून अधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला भाजप जवळपास 70-80 जागा देण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या कोट्यातून आरपीआयसाठी देखील 2-3 जागा देण्यात येणार आहे.
BMC Election 2026: महायुतीच्या प्रचाराची रणनीती ठरणार
दरम्यान, आजच्या बैठकीत शिवसेनेचे 2017 सालचे माजी नगरसेवक शिंदेंसोबत आले आहेत, त्यांच्या संदर्भात निश्चिती होणार आहे. मात्र, उबाठामध्ये असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजप अनुकूल नाही. अशात, यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता आहे. मुस्लिम बहुल क्षेत्रात शिंदेंच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्यास त्या देखील जागांवर चर्चा होणार आहे. मुंबई पालिकेसाठी महायुतीच्या प्रचाराची रणनीती देखील याच बैठकीत ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Shiv Sena : शिवसेनेकडून 125 जागांची मागणी?
तर दुसरीकडे शिवसेनेकडून जागांच्या वाटाघाटीत 125 जागांची भाजपकडे मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे आजी आणि माजी असे मिळून 125 नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीचा विचार केला तर ठाकरे गटाच्या विरोधात शिंदे फॅक्ट्रर अधिक प्रभावी चालू शकतो, असा दावा यावेळी शिवसेना नेत्यांकडून केला जाऊ शकतो. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सीट शेअरिंग तसेच प्रचार (कॅम्पेन) रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे. मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्यासह काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























